ब्राझिलियन व्हॅक्स, बिकीनी व्हॅक्स यांची तरुण मुलींमध्ये क्रेझ असते. जाहिरातीत किंवा इंटरनेटवर पाहून तरुण मुली किंवा अगदी महिलाही असे प्रयोग स्वत:वर करुन घेतात. मात्र नाजूक जागेवर असे प्रयोग करताना त्याबाबतचे पुरेसे ज्ञान नसेल तर अपघात घडू शकतात. नुकतीच अशीच एक घटना घडली असून त्यामुळे महिलेला बिकीनी व्हॅक्स करताना नाजूक भागाची त्वचाच सोलली गेली. मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडलेल्या या घटनेत महिलेने सलून मालकाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तब्बल २ वर्षांनी त्याला दंड ठोठावण्यात आला आहे ग्राहक न्यायालयाने स्पा मालकाला ७० हजार रुपये दंड ठोठावला. एक-दोन नाही तर आजवर १५ स्पा मालकांना असे दंड करण्यात आल्याचेही न्यायालयाने नमूद केले. ही महिला नोव्हेंबर २०२१ मध्ये स्थानिक सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी तिने ४५०० रुपयांचे प्रिमियम ब्राझिलियन (बिकीनी) व्हॅक्स करण्यास सांगितले. हे वॅक्स इतके गरम होते की महिलेला चटका बसला आणि पट्टी ओढून काढताना तिची त्वचा सोलून निघाली. त्यामुळे हे सारे करताना काळजी घेणं फार गरजेचं आहे (Know How Bikini Brazilian Waxing is Dangerous for Health ).
बिकिनी व्हॅक्स म्हणजे नक्की काय?
योनीमार्गाच्या आसपास असलेला एक न एक केस व्हॅक्सिंग करून काढून टाकणे. जेणेकरून बिकिनी घातली तरी काहीही दिसू नये हा बिकिनी व्हॅक्सचा उद्देश असतो. हा भाग अतिशय नाजूक आणि संवेदनशील असल्याने साहजिकच ही प्रक्रिया करून घेणे वेदनादायक असते. तरीही बऱ्याच तरुण मुली आणि काही वयाने मोठ्या स्त्रियाही सलूनमध्ये जाऊन हे नियमित करून घेतात.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी सांगतात...
स्त्रियांच्या योनीमार्गाच्या भागात असलेले केस योनिमार्गाचे संरक्षण करत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या जीवाणूंचे वास्तव्य या भागात आणि योनीमार्गाच्या आतही असते. या जीवाणूंमुळे योनीमार्गाची प्रतिकारशक्ती टिकून राहते आणि वेगवेगळ्या संसर्गाचा जास्त चांगला प्रतिकार होऊ शकतो. हे सगळे केस जेव्हा शेविंग किंवा व्हॅक्सिंग करून काढले जातात तेव्हा या केसांची मुळे उघडी पडतात, दुखावली जातात. त्यामुळे केसांच्या मुळात वेगवेगळे जंतुसंसर्ग होऊ शकतात. योनीमार्ग पूर्ण उघडा पडल्याने जास्त कोरडेपणा येऊ शकतो.परिणामी त्या भागात बाहेर आणि आतल्या बाजूलाही जंतुसंसर्ग होऊ शकतात. कोरडा पडलेल्या योनिमार्गात प्रतिकार शक्ती कमी होते तसेच खाज सुटू शकते. म्हणूनच योनिमार्गाच्या भागातले केस समूळ काढण्यापेक्षा कात्रीने काळजीपूर्वक कमी करणे हे सर्वात योग्य आहे. त्यामुळे स्वच्छता पण राखली जाते आणि बाकी त्रास होत नाही. त्यामुळे सौंदर्याच्या काहीतरी विचित्र कल्पना मनाशी पक्क्या धरून उगाच स्वतःच्या शरीराचे असे हाल हाल करून घेऊ नका. योग्य ती माहिती घेऊन मगच अशा गोष्टींच्या वाट्याला गेलेले केव्हाही चांगले.