आपला मूड आणि आपलं खाणंपिणं यांचा जवळचा संबंध असतो. स्ट्रेस इटिंग ही संकल्पना तर अजिबात नवीन नाही. ब्रेकअप झालं की अनेकजण खा खा खातात. काही खाणंच सोडून देतात. आनंदात आपण गोड खातो. मूड बरा नसेल तर साधं लिंबू सरबत आपल्याला रिफ्रेशिंग वाटतं. वेफर्स खाल्ले की अनेकांचा मूड छान होतो. एवढंच कशाला आईच्या, आजीच्या हातची चव म्हणून आपण जे आनंदानं आठवतो त्या त्या पदार्थाला त्या त्या वातावरणाची, माणसांची, आनंदाची-दु:खाची एक खास सय असते. पावसातली भजी, मित्रांसोबतचं कटिंग, सिनेमा पाहतानाचे पॉपकॉर्न, प्रसादाचा शिरा, ईदचा शिरखुर्मा कितीतरी गोष्टी. त्या त्या प्रसंगाला त्यांची चव जशी असते तशी अजिबात एरव्ही लागत नाही. यासाऱ्याचा संबंध पदार्थाच्या चवीसह आपल्या मूडशीही असतो आणि त्याउलट आपण जे खातो त्याप्रमाणे आपला मूडही बदलतो आणि मनोवस्थाही. त्यामुळे वॉचफूल डाएट, माइण्डफूल डाएट या नव्या संकल्पना आता चर्चेत आहेत.
आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडां इन्स्टाग्राम पोस्टमध्ये यासंदर्भात काही रंजक गोष्टी सांगतात. १.आहार सात्विक असेल तर आपली वृत्तीही सकारात्मक रहायला मदत होते. त्यामुळे आहारात ताजी फळे, भाज्या, भाकरी, मोड आलेली कडधान्ये, मध, औषधी वनस्पती, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहारात असावेत.
२. जास्त मसालेदार पदार्थ, कांदा-लसूण, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स, चहा, साखरयुक्त पदार्थ, जास्त चॉकलेट हे सारे पदार्थ आहारात बेताने आणि संतूलित प्रमाणात खावे.
३.शिळे, पॅक फूड, पुन्हा पुन्हा गरम केलेले अन्न, दारु, सिगारेट हे कायम टाळलेलेच बरे.