रोज कोणती भाजी करायची असा प्रश्न तमाम महिलांपुढे असतो. यातही ही भाजी घरातल्या सगळ्यांना आवडणारी हवी नाहीतर मग काहीवेळा २ भाज्याही कराव्या लागतात. शरीराला जास्तीत जास्त पोषण मिळावे यासाठी सगळ्या चवीच्या, रंगाच्या आणि प्रकारच्या भाज्या आहारात असायला हव्यात. टोमॅटो आपण वाटण करायला, भाजीमध्ये आंबटसर चव आणण्यासाठी, कोशिंबीर किंवा एखादवेळी भाजी करण्यासाठीही वापरतो. पण हा टोमॅटो सहसा लाल असतो. बाजारात सध्या हिरवा टोमॅटोही मिळत असून आरोग्यासाठी तो फायदेशीर असतो (Know how green tomatoes are useful for health).
हिरवा टोमॅटो म्हणजे कच्चा टोमॅटो असा आपला समज असतो. पण ही टोमॅटोची एक वेगळी जात असून यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असे बरेच पोषक घटक असतात. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन के, बीटा केरोटीन, अँटीऑक्सिडंटस असे उपयुक्त घटक असतात. मूगाची किंवा हरभरा डाळ घालून परतून ही भाजी फार छान होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी हिरवा टोमॅटो कसा फायदेशीर ठरतो पाहूया...
१. डोळ्यांसाठी उपयुक्त
हिरव्या टोमॅटोमध्ये असणारे बीटा केरोटीन आणि व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. दृष्टी चांगली राहण्यासाठी आणि डोळ्यांचा कोरडेपणा दूर होण्यासाठी हे घटक फायदेशीर ठरतात. नेत्रपटलाचे संरक्षण करण्यासाठी हा टोमॅटो खाण्याचा चांगला फायदा होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे आहारात हिरव्या टोमॅटोचा आवर्जून समावेश करायला हवा.
२. बीपीवर फायदेशीर
या टोमॅटोमध्ये सोडीयम कमी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तवाहिन्या ओपन होण्यास मदत होते. रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास याची चांगली मदत होते. पोटॅशियम जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीरातून सोडीयम बाहेर पडते. तसेच यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन केमुळे रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत.