मैदा हा आपल्या रोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक झाला आहे. गेल्या काही वर्षात भारतात मैदा खाण्याचे प्रमाण जास्त वाढल्याचे दिसून आले आहे. परदेशात जास्त प्रमाणात खाल्ला जाणारा हा मैदा भारतात कधी आणि कसा आला हे आपल्यालाही समजले नाही. पण सकाळी झोपेतून उठल्यावर चहासोबत बिस्कीटे किंवा टोस्ट खाण्यापासून ते ब्रेड, सामोसा, रोल, कच्छी दाबेली, वडापाव यांसारख्या बऱ्याच पदार्थांतून मैदा आपल्या पोटात जातो. मैदा आरोग्यासाठी घातक असल्याने त्याचा आहारात जास्त प्रमाणात समावेश करु नये असे सांगितले जाते. मात्र तरीही आपण हा मैदा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात खातोच (Know How Maida work for our body Diet tips).
मैदा आतड्यात चिकटून बसतो?
मैदा खाल्ल्यानंतर तो आतड्यात चिकटून बसतो असे अनेकदा बोलले जाते. या गोष्टीत खरंच कितपत तथ्य आहे याबाबत आज आपण समजून घेणार आहोत. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अमिता गद्रे सांगतात. की मैदा आतड्यात चिकटतो असे अजिबातच काही नसते. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आपण मैद्याचे पीठ खात नसून त्यापासून तयार झालेला पदार्थ खात असतो. त्यामुळे तो पदार्थ तळलेला, भाजलेला किंवा बेक केलेला असतो. तसेच चावल्यानंतरही पोटात पचनक्रिया होते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्येही त्या मैद्यावर क्रिया होत असते.त्यामुळे तो पोटात चिकटून बसण्याचा प्रश्नच नसतो.
मग मैदा आरोग्यासाठी घातक का?
मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे जास्त प्रमाणात मैदा खाल्ला तर आपल्याला पोटजड होणे, कॉन्स्टिपेशन यासारख्या समस्या होण्याची शक्यता असते.तसेच शुगरसारखी समस्या असणाऱ्यांनी तर मैदा शक्यतो खूपच कमी प्रमाणात खावा. कारण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.