Join us   

मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेलं खाऊ नये, रेडिएशन घातक, कॅन्सर होतो, असं सगळं तुम्हालाही खरंच वाटतं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2023 9:28 AM

Know how Microwave is safe or not according to Pankaj Bhadauria : प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात...

मायक्रोवेव्ह ओव्हन ही आता स्वयंपाक घरातील एक महत्त्वाची गोष्ट झाली आहे. गेल्या काही वर्षांत आपल्यापैकी अनेकांच्या घरात अगदी सहज आलेल्या या मायक्रोवेव्हचा वापर कसा वाढत गेला ते आपल्यालाही कळले नाही. घाईच्या वेळी झटपट पदार्थ गरम करण्यापासून ते एखादा पदार्थ शिजवण्या, बेक करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी आपण अगदी सहज मायक्रोवेव्हमध्ये करतो. मात्र आजही आपल्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हनबद्दल बरेच गैरसमज असलेले पाहायला मिळतात. ओव्हनमधून येणारे रेडीएशन्स आरोग्यासाठी घातक असतात, त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केले की त्या अन्नाचे पोषण कमी होते असे एक ना अनेक गैरसमज आपल्या डोक्यात असतात. कोणाचे ऐकून किंवा काही वाचून आपल्या डोक्यात या गोष्टी पक्क्या झालेल्या असल्या तरी त्या चुकीच्या आहेत हे वेळच्या वेळी लक्षात घ्यायला हवे. कारण यामध्ये काहीही तथ्य नसते. म्हणूनच मायक्रोवेव्हबाबत आपल्य़ा डोक्यात असणारे गैरसमज वेळीच दूर करायला हवेत. प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात (Know how Microwave is safe or not according to Pankaj Bhadauria)...

१. मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने अन्नाचे पोषण कमी होते?

हा समज अतिशय चुकीचा असून आपण अन्न उकडतो, शिजवतो तेव्हा त्यावर एकप्रकारची प्रक्रिया होते. तीच प्रक्रिया मायक्रोवेव्हमध्ये होत असल्याने यामध्ये अन्नाचे पोषण कमी होते असे वाटणे अतिशय चुकीचे आहे. तळल्याने, बेक केल्याने किंवा उकडल्याने अन्नाचे पोषण मायक्रोवेव्हपेक्षा जास्त प्रमाणात कमी होते. त्यामुळे हा समज डोक्यातून काढून टाकायला हवा. 

२. मायक्रोवेव्हमधून येणारे रेडीएशन्स घातक असतात का? 

मायक्रोवेव्ह हा एखाद्या बल्बप्रमाणे असतो असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. आपण बल्ब बंद केल्यावर त्याचा लाईट बंद होतो त्याचप्रमाणे मायक्रोवेव्ह बंद केल्यावर त्यातून कोणत्याही प्रकारचे रेडीएशन्स येत नाहीत. 

३. मायक्रोवेव्हमध्ये अन्न शिजवल्याने कॅन्सर होतो?

मायक्रोवेव्हमुळे कॅन्सर होतो असा बऱ्याच जणांचा समज असतो. मात्र आतापर्यंत असे कोणत्याही संशोधनातून सिद्ध झालेले नाही. मायक्रोवेव्हमुळे पदार्थाचे पोषण, रंग टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे हा समज चुकीचा आहे. 

 

४. मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताना काय काळजी घ्यायला हवी?

आपण मायक्रोवेव्हसाठी जी भांडी वापरतो ती चांगल्या प्रतीची असतील याची काळजी आवर्जून घ्यायला हवी. शक्यतो काचेच्या किंवा सिरॅमिकच्या भांड्यांचा वापर करावा. जर प्लास्टीक वापरणार असाल तर त्या प्लास्टीकची गुणवत्ता मायक्रोवेव्ह सेफ आहे की नाही हे तपासून घ्यायला हवे. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स