प्रत्येकाची जेवण्याची पद्धत वेगवेगळी असते. प्रांत, आवडीनिवडी, पदार्थांची उपलब्धता यानुसार आपल्या ताटातील पदार्थ बदलतात. पण आपण जे जेवतो त्यामध्ये कोणते पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खायला हवेत, कोणते पदार्थ त्यानंतर खायला हवेत आणि सगळ्यात शेवटी काय खायला हवे याचा क्रम योग्य असायला हवा. आपण योग्य क्रमाने ताटातील योग्य पदार्थ खाल्ले तर त्यातून शरीराला नक्कीच जास्त चांगले पोषण मिळू शकते. अनेकदा आपण खूप घाईत, कामाच्या टेन्शनमध्येच डब्यातील पोळी-भाजी खातो. बरेचदा काही कारणाने आपल्याला बाहेरही खावे लागते. केवळ पोट भरण्यासाठी आणि भूक लागली म्हणून खाणे आरोग्यासाठी योग्य नाही (Know How Salad is Important for Diabetic Patients).
अनेकदा आपल्याला आहारतज्ज्ञ जेवणाच्या आधी सॅलेड खायला पाहिजे हे आवर्जून सांगतात. मात्र घाईत आपण त्याकडे पुरेसे लक्ष देतोच असे नाही. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शहा-पांचाळ सॅलेड खाण्याचे किती महत्त्व आहे आणि त्यामुळे डायबिटीस असणाऱ्यांना कसा फायदा होतो याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून त्या आपल्याशी हे शेअर करतात. त्या या पदार्थांच्या क्रमाबाबत नेमके काय सांगतात पाहूया...
१. जेवणाच्या सुरुवातीला सॅलेड खायला हवं असं आवर्जून सांगितलं जातं. मात्र आपण त्याकडे पुरेसं लक्ष देत नाही. पण जर आपण नियमित योग्य पद्धतीने सॅलेड खाल्ले तर डायबिटीससारखी समस्या असणाऱ्यांसाठी ते अतिशय फायदेशीर ठरते.
२. सॅलेड खाल्ल्याने आपल्या आतड्यांमध्ये एकप्रकारचे जाळ्याचे आवरण तयार होते. ज्यामुळे आपण त्यानंतर जे खातो त्यातून शरीरात ग्लुकोज कमीत कमी प्रमाणात शोषले जाते.
३. सॅलेड न खाता आपण जेवण केले तर शरीरात ग्लुकोज खूप जास्त प्रमाणात शोषले जाते आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्यांनी आणि नसलेल्यांनीही प्रत्येक जेवणाच्या आधी सॅलेड आवर्जून खायलाच हवे.