Join us   

रात्रीची निवांत झोप तुमचा मेंदू ठेवते तरुण! मेंदू आजारी पडू नये म्हणून झोप करते ‘असं’ काम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2023 3:31 PM

Know How Sleep is Important in our life for good health : अपुऱ्या झोपेचा आपल्या हृदयावर, श्वसनक्रियेवर, मेंदूवर आणि इतरही अनेक अवयवांवर ताण येत असतो.

झोप ही आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी किती महत्त्वाची गोष्ट असते हे आपल्या सगळ्यांनाच माहित असते. त्यातही रात्रीची शांत, सलग झोप मिळाल्यास आरोग्याच्या बहुतांश तक्रारी दूर होतात हे लक्षात घ्यायला हवे. पुरेशी नीट झोप झाली असेल तर पचनाच्या, मानसिक तसेच इतर समस्या दूर होण्यास मदत होते. हे सगळे माहिती असले तरीही हातात असणारी स्क्रीन, ताणतणाव, कामाचे प्रेशर, घरगुती समस्या यांसारख्या काही ना काही कारणांनी आपण रात्री उशीरा झोपतो आणि सकाळी तर काम असल्याने आपल्याला वेळेत उठण्याशिवाय पर्यायच नसतो. या सगळ्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि आरोग्य हळूहळू बिघडायला लागते. झोपेचा आपल्या हृदयावर, श्वसनक्रियेवर, मेंदूवर आणि इतरही अनेक अवयवांवर ताण येत असतो. तो आपल्याला त्या वेळी जाणवला नाही तरी कधी ना कधी हा ताण बाहेर येतो आणि मग तेव्हा हातातून वेळ निसटून गेलेली असते. मात्र यामागे नेमके शास्त्रीय काय कारण असते ते समजून घ्यायला हवे (Know How Sleep is Important in our life for good health).

झोप न झाल्याने नेमके काय होते?

आपल्या शरीरात दोन अंतर्गत सर्कॅडियन रिदम आणि होमिओस्टॅसिस अशा २ यंत्रणा कार्यरत असतात. जेव्हा तुम्ही जागे असता आणि झोपता तेव्हा ते नियमन करण्यासाठी या दोन्ही यंत्रणा एकत्रितरित्या काम करतात.

1. आपल्या दैनंदिन व्यवहारामधील  शरीराचे तापमान, चयापचय आणि हार्मोन्स सोडण्यापर्यंत विविध प्रकारची कार्ये योग्य पद्धतीने चालण्यासाठी सर्केडियन रिदम ही सिस्टीम कार्यरत असते. यामुळे आपली झोपेची वेळ नियंत्रित होते आणि  रात्री ठरलेल्या वेळेला झोप येणे, सकाळी अलार्मशिवाय उठणे यांसारखी कामे शरीराकडून सहजपणे केली जातात. 

2. स्लीप-वेक होमिओस्टॅसिस तुमच्या झोपेच्या गरजेचा मागोवा ठेवते. होमिओस्टॅटिक स्लीप ड्राइव्ह शरीराला ठराविक वेळेनंतर झोपण्याची आठवण करून देते आणि झोपेची तीव्रता नियंत्रित करते. तुम्ही जागे असता त्या प्रत्येक तासाला ही स्लीप ड्राइव्ह अधिक मजबूत होते आणि झोपेच्या कमतरतेच्या कालावधीनंतर तुम्हाला जास्त वेळ आणि अधिक गाढ झोपायला लावते.

झोपेवर परिणाम करणारे घटक वैद्यकीय परिस्थिती, औषधे, तणाव, झोपेचे वातावरण आणि तुम्ही काय खाता-पिता यावर अवलंबून असते. कदाचित सर्वात मोठा प्रभाव म्हणजे प्रकाशाचा संपर्क. तुमच्या डोळ्यांच्या म्हणजे डोळयातील पडद्यामधील विशेष पेशी प्रकाशावर प्रक्रिया करतात आणि मेंदूला सांगतात की तो दिवस आहे की रात्र आहे आणि झोपेचे-जागण्याचे चक्र पुढे करू शकतात. झोपेची कमतरता हे एक सायलेंट किलर आहे आणि हृदयविकार, किडनी रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात आणि लठ्ठपणा यांसह अनेक आरोग्याच्या समस्यांशी त्याचा थेट संबंध असतो.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल