Join us   

तुम्हीही रोज चहा बिस्कीट खाता? एकेक पुडा संपवता? डॉक्टर सांगतात, पोट भरेलही पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2023 6:09 PM

Know How Tea and biscuits are unhealthy : त्याऐवजी मुलांना झटपट करुन देता येईल असा पारंपरिक पदार्थ...

सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा घाईगडबडीत ऑफीसला पोहोचल्यावर भूक लागली म्हणून अनेकांना चहा आणि बिस्कीटे खाण्याची सवय असते. झटपट कुठेही उपलब्ध होणारे, स्वस्तात मस्त आणि पोटभरीचे असले तरी चहा-बिस्कीट खाणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. काही जण दिवसाच्या कोणत्याही वेळेला चक्क एक पूर्ण पुडा बिस्कीटे आणि चहा घेतात. इतकेच नाही हे लोक आपल्या मुलांनाही अशाप्रकारे चहा बिस्कीटे देतात. भूक लागल्यावर खाण्यासाठी हा सोपा उपाय असला तरी तो आरोग्यासाठी तितकाच धोकादायक आहे हे लक्षात घ्यायला हवे. भारतात चहासोबत टोस्ट, खारी, बिस्कीटे हा नाश्ता अतिशय सामान्य असला तरी त्यामुळे आरोग्याची हेळसांड होत असल्याचे पालकांनी वेळीच लक्षात घ्यायला हवे. प्रसिद्ध डॉ.छाया शहा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच याविषयीचा एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये त्यांनी चहा-बिस्कीटे खाण्याचे तोट तर सांगितले आहेतच पण त्याऐवजी आपण झटपट होईल असे मुलांना काय देऊ शकतो हे सांगितले आहे. त्या काय सांगतात समजून घेऊया (Know How Tea and biscuits are unhealthy)...

बिस्कीटे, टोस्ट घातक कारण...

बिस्कीटे ही मैदा आणि साखर यांचा वापर करुन तयार केलेली असतात. तसेच यामध्ये पाम ऑईलचे प्रमाणही जास्त असल्याने ती खाणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. हे सगळे घटक लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही अतिशय घातक असतात. टोस्ट म्हणजे ब्रेडचा डीहायड्रेट केलेला प्रकार. यातील चांगले फायबर काढून घेतलेले असतात त्यामुळे त्यामध्ये पोषणमूल्य म्हणावे असे काहीच नसते. तसेच यातही पाम ऑईल जास्त प्रमाणात असल्याने ते आरोग्यासाठी घातक असते. त्यामुळे मुलांना सर्रास बिस्कीटे देताना पालकांनी हा विचार अवश्य करायला हवा. एखादवेळी बदल म्हणून बिस्कीटे देणे ठिक आहे पण मुलं किंवा पालकही सतत चहा-बिस्कीटे खाणे आरोग्यासाठी फायद्याचे नाही.

चहा-बिस्कीटाला पर्याय काय?

अशावेळी मुलांना पोह्यासारखे करायला अतिशय सोपे आणि आरोग्यासाठी फायदेशीर असा नाश्ता जरुर देऊ शकता. सकाळच्या घाईत झटपट होतील असे अनेक पदार्थ थोडेसे नियोजन केले तर नक्की करता येऊ शकते त्यामुळे चहा-बिस्कीटांना योग्य पर्याय अवश्य शोधायला हवेत. पोह्यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट असल्याने ते आरोग्यासाठी चांगले असतात. त्यात भरपूर दाणे घातल्यास प्रोटीन मिळण्यासही मदत होते. तसेच पोह्यामध्ये फक्त कांदा किंवा बटाटा घालण्याऐवजी आपण मटार, गाजर, कोबी यांसारख्या भाज्या अवश्य घालू शकतो. ज्यामुळे शरीराला व्हिटॅमिन्स आणि फायबर्स मिळण्यास मदत होते. तसेच यावर लिंबू पिळल्यास व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात मिळण्यास मदत होते. यासोबतच १ ग्लास दूध दिल्यास मुलांच्या शरीरातील कॅल्शियम आणि प्रोटीन वाढण्यास मदत होईल. यावर भरपूर कोथिंबीर घातली तर व्हिटॅमिन सी आणि इ मिळण्यास मदत होते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलपालकत्वआहार योजना