Join us   

आंघोळ करुनही फ्रेश वाटत नाही, अंगाला दुर्गंधी? १ मिनिटाचा सोपा उपाय, शाही स्नानाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2023 4:41 PM

Know How To Make Cooling Ubatan For Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात टॅनिंग कमी होण्यासाठी, पुरळ, रॅशेस दूर होण्यासाठी डॉक्टर सांगतात आयुर्वेदिक उटणं..

उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान वाढल्याने अंगाची लाहीलाही होते. इतकेच नाही तर उन्हाचा चटका बसल्याने त्वचा टॅन होते. घामाघूम होत असल्याने पुरळ येणे, रॅशेस येणे, अंगाला घामाचा वास येणे यांसारख्या समस्याही उन्हाळ्याच्या दिवसांत उद्भवतात. या समस्या दूर करण्यासाठी आपण दिवसातून २ वेळा आवर्जून आंघोळ करतो. तसेच अंगाला पावडर लावणे, परफ्यूम किंवा डिओड्रंटचा वापर करणे यांसारखे उपाय आपण करतो. पण त्याचा म्हणावा तितका उपयोग होतोच असे नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत घामाचा वास जाण्यासाठी आणि त्वचा स्वच्छ होण्यासाठी आपण वेगळ्या प्रकारचे साबण किंवा बॉडी वॉश वापरतो. असे असले तरी त्वचेशी निगडीत समस्या कमी होतातच असं नाही (Know How To Make Cooling Ubatan For Summer Skin Care Tips). 

थंडीत आपण त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी ज्याप्रमाणे उटणं वापरतो त्याचप्रमाणे उन्हाळ्यासाठीही घरच्या घरी आपल्याला छान उटणं तयार करता येऊ शकतं. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री हे उटणं कसं तयार करायचं आणि शरीराला त्याचे काय फायदे होतात याबाबत माहिती देतात. शरीराला थंडावा देणारं हे उटणं तयार करण्यासाठी आयुर्वेदातील उपयुक्त अशा काही वनस्पतींचा यामध्ये वापर केल्यास त्याचा फायदा होतो. तसेच या उटण्यामुळे घामाचे प्रमाणही नकळत कमी होण्यास मदत होते. दिवसभर त्वचा फ्रेश राहण्यासाठी आणि त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठीही हे उटणं उपयुक्त ठरतं. उष्णतेमुळे चेहऱ्यावर पुरळ किंवा फोड आले असतील तर फेस मास्क म्हणूनही या उटण्याचा वापर करु शकतो. पाहूया हे उटणं कसं तयार करायचं. 

(Image : Google)

१. वाळा पावडर, चंदन पावडर आणि आवळा पावडर सम प्रमाणात एकत्र करावी.

२. ही पावडर एका बरणीत किंवा डब्यात भरुन ठेवावी. 

३. रोज आपण आंघोळ करताना ज्याप्रमाणे साबण लावून अंग स्वच्छ करतो त्याचप्रमाणे या पावडरमध्ये थोडे पाणी घालून साबणाप्रमाणे ते सगळ्या अंगाला लावावे. 

 

४. या तिन्हीही गोष्टी थंड प्रकृतीच्या असतात त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा चांगला फायदा होतो. तसेच सेन्सिटीव्ह त्वचेसाठीही हे उटणे फायदेशीर असते. 

५. या पावडरी घरात करणे शक्य नसेल तर बाजारातील आयुर्वेदीक दुकानात त्या सहज उपलब्ध असतात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलब्यूटी टिप्सघरगुती उपाय