पचनक्रिया सुरळीत राहणे ही आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. दिवसभरात आपण खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होण्यासाठी शरीराची आवश्यक तितकी हालचाल होणेही महत्त्वाचे असते. मात्र पुरेशी हालचाल झाली नाही किंवा पचनक्रियेत अडथळे निर्माण झाले तर पोटाच्या तक्रारी निर्माण होतात. बरेचदा अन्न नीट पचले नाही तर गॅसेस होणे, वाताच्या तक्रारी, बद्धकोष्ठता, अॅसिडीटी यांसारख्या समस्या निर्माण होतात (Know How to take care of your digestion and gut health).
पण असे होऊ नये म्हणून काही किमान गोष्टी रोजच्या जीवनशैलीत करायला हव्यात. अन्न पचण्यासाठी शरीराची किमान हालचाल, जेवल्यावर शतपावली, ४ घास कमी खाणे या गोष्टींकडे लक्ष दिल्यास पचनक्रिया सुरळीत राहते. तसेच जेवल्यावर न चुकता २ गोष्टी केल्यास खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. तसेच अतिरीक्त चरबी नियंत्रणात राहण्यासही याचा चांगला फायदा होतो. प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेसतज्ज्ञ अंशुका परवानी या २ गोष्टी कोणत्या ते सांगतात, पाहूया...
१. वज्रासन
वज्रासन हे पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी सर्वात उत्तम आसन मानले जाते. या आसनामुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, अॅसिडीटी यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच पेल्व्हिक स्नायू मजबूत होण्यासाठी वज्रासनाचा चांगला उपयोग होतो. सुरुवातीला २ ते ३ मिनीटे करत हळूहळू या आसनाची वेळ वाढवत न्यायची.
२. पुषन मुद्रा
उजव्या हाताची पहिली २ बोटे आणि अंगठा एकमेकांना जोडावा. डाव्या हाताची मधली २ बोटे आणि अंगठा जोडावा. वज्रासनात बसून ही मुद्रा केल्यास पोटातील गॅसेस दूर होण्यास मदत होते. जेवणाने पोट जड झाले असेल तर ही मुद्रा केल्याने चांगला फायदा होतो. सुरुवातीला ही क्रिया ३ ते ५ मिनीटे करायची नंतर हळूहळू वाढवत १५ मिनीटांसाठी करायची.