आयुर्वेदीक आणि धार्मिक महत्त्व असलेली तुळस भारतीयांच्या घरातबाहेर आवर्जून लावलेली दिसते. बरेच जण न चुकता रोजच्या रोज देवासोबत या तुळशीची पुजाही करतात. आयुर्वेदात अतिशय महत्त्व असलेली ही तुळस आरोग्याच्या बऱ्याच तक्रारींसाठी अतिशय फायदेशीर असते. केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आजारांवरील औषधांतही तुळशीचा वापर होतो. इतकेच नाही तर कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरील औषधातही तुळस वापरली जाते. तुळशीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम, झिंक, लोह, क्लोरोफील असे बरेच घटक समाविष्ट असतात. आयुर्वेदात मलेरीया, पोटाचा अल्सर, डोळ्यांच्या समस्या अशा बऱ्याच तक्रारींवर तुळस गुणकारी ठरते. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर दिक्षा भावसार तुळशीचे विविध फायदे सांगतात (Know How Tulsi Basil leaf are beneficial for health Issues) .
१. कोलेस्टेरॉल कमी होण्यास फायदेशीर
कोलेस्टेरॉल ही सध्या सर्वच वयोगटातील वाढती समस्या आहे. कोलेस्टेरॉल वाढल्यास हृदयविकाराचा धोका असल्याने ते नियंत्रणात ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. तुळशीत अँटीव्हायरल आणि अँटी कोलेस्टेरॉल गुणधर्म असतात. त्यामुळे लिपिड कमी करण्यासाठी, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी नियमित तुळस खायला हवी.
२. किडणी साफ करण्यास उपयुक्त
तुळस एकप्रकारची डीटॉक्सिफायर म्हणूनही काम करते. यात असणारे गुण किडणी साफ करण्यास फायदेशीर ठरतात. तसेच रक्तात जमा झालेले युरीक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी तुळस खाणे फायदेशीर असते.
३. पोट साफ होऊन पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिणे दिवसाची सुरुवात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. विषारी पदार्थ शरीराबाहेर पडण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. अँटीऑक्सिडंटस असल्याने पोटातील अनावश्यक घटक शरीराबाहेर पडण्यास मदत होते.
४. श्वसनाच्या तक्रारींवर फायदेशीर
श्वसनाच्या रोगांवर इलाज करण्यासाठी तुळशीची पाने अतिशय चांगला उपाय आहे. फुफ्फुसं साफ करण्यासाठी ही पाने फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुळशीच्या पानांचा चहा किंवा काढा आवर्जून प्यायला हवा.
तुळशीचा वापर कसा करावा?
तुळस चावून खाऊ नये, कारण त्यामुळे यात असणारा पारा आपल्या पोटात जातो. जो आरोग्यासाठी चांगला नसतो. त्यामुळे तुळशीचा काढा, गोळी, पावडर अशा स्वरुपात तुळशीचा आहारात समावेश करायला हवा.