रोजच्या स्वयंपाकात फोडणी देताना आपण आवर्जून हळदीचा वापर करतो. चेहऱ्यावरील फोड, मुरूम, सुरकुत्या किंवा अन्य काही समस्यांसाठीही चेहऱ्याला हळदीचा पॅक लावावा असे आवर्जून सांगितले जाते. ही एक औषधी वनस्पती असून त्यात 'कर्क्युमिन' नावाचा एक महत्त्वाचा घटक असतो. इतकेच नाही तर हळदीत आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक गुणधर्म असतात. हळद अँटिबायोटिक, एनाल्जेसिक, अँटिऑक्सिडेंट, अँटिइंफ्लेमेटरी, अँटीकार्सिनोजेनिक आणि अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते. त्यामुळेच हळद ही साध्या सर्दी खोकल्यापासून हदयविकार, कॅन्सरसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी परिणामकारक आहे. त्याचप्रमाणे दिर्घायुष्यासाठीही ही हळद अतिशय फायदेशीर असते असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे (Know How Turmeric Curcumin Slows Aging According to scientists in new research published in biologia futura journal).
आपल्याकडे पिकणाऱ्या हळदीचे आपल्याला म्हणावे तेवढे महत्त्व कळलेले नाही. त्यामुळे भारताकडे हळदीचे पेटंट असताना परदेशात त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होताना दिसते. देश परदेशात हळदीवर अनेक अभ्यास झाले आहेत. अजूनही पाश्चात्य देशातल्या वैद्यकीय संस्थामधे, युनिर्व्हसिटीजमधे हळदीच्या गुणधर्मावर आणि हे गुणधर्म कोणकोणत्या आजारांवर किती परिणामकारक आहे यावर अभ्यास आणि संशोधन सुरु आहे. हळद आयुष्य वाढण्यासाठी म्हणजेच आपण दिर्घकाळ जगावे यासाठिही अतिशय उपयुक्त ठरते.
आलाहाबाद विद्यापीठात नुकतेच हळदीवरील एक संशोधन प्रसिद्ध करण्यात आले. प्राध्यापक एस.आय रिझवी यांनी या संशोधनाचे प्रमुख म्हणून काम पाहिले. हळदीमध्ये असणाऱ्या कर्क्युमिन या घटकामुळे शरीरातील कॅलरीज नियंत्रणात येतात आणि त्याचा परीणाम म्हणून वृद्धत्वाची प्रक्रिया मंद होण्यास मदत होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्प्रिंगर नेचर प्रकाशनाच्या बायोलॉजिया फ्युचुरा या जरनलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. यासाठी उंदरांवर चाचण्या घेण्यात आल्याचे रिझवी यांनी सांगितले. या संशोधनामुळे वृद्धत्त्व येऊ नये यासाठी तयार करण्यात येणाऱ्या औषधांचे संशोधन करण्यास मदत होणार आहे. तसेच स्वयंपाकात आणि पारंपरिक वैद्यक पद्धतीही हळदीचा वापर वाढायला हवा असे मत त्यांनी नोंदवले.