आपले जात स्वच्छ राहावेत आणि तोंडाचा वास येऊ नये म्हणून दिवसातून २ वेळा दात घासायला हवेत असं आपल्याला लहानपणी आवर्जून शिकवलं जातं. लहान असताना आपण २ वेळा दात घासतोही. मात्र जसजसे मोठे होत जातो तसे आपण झोपेतून उठल्यावर दात घासतो. मात्र रात्री झोपताना दात घासायचा कंटाळा करतो. हे एकीकडे तर काही लोकांना इतकी जास्त स्वच्छता लागते. की ते प्रत्येक खाण्यानंतर दात घासतात. असे केल्याने त्यांच्या दातात अन्नाचे कण अडकून राहण्याची शक्यता नसते, त्यामुळे ते लवकर किडतही नाहीत (Know Important Tips about Dental Hygiene).
मात्र इतके सतत दात घासल्याने नैसर्गिकरित्या दातांवर तयार होणारे इनॅमल नष्ट होते आणि त्यामुळेही दात लवकर खराब होतात. आपण आपल्या स्वच्छतेची आणि आरोग्याची जशी काळजी घेतो तितकी आपण दातांची घेत नाही. त्यामुळे दात किडणे, पडणे, दुखणे अशा समस्या कमी वयात सुरू होतात. एकदा दातांचे दुखणे मागे लागले की ते सहन न होणारे असते आणि त्यासाठी खर्चही खूप जास्त येतो. असे होऊ नये म्हणून दात नेमके कधी, दिवसातून किती वेळा आणि कसे घासायला हवेत? असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. तर आज आपण त्याचीच उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दात नेमके कधी घासावेत?
अनेक जण झोपेतून उठल्या उठल्या दात घासतात खरे. पण त्यानंतर ते लगेचच चहा किंवा कॉफी घेतात. असे केल्याने दातांवर पुन्हा एकप्रकारचा थर जमा होतो. त्यामुळे ब्रश केल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नये. साधारणपणे ब्रश केल्यानंतर अर्धा तासाने ब्रेकफास्ट करावा. त्यानंतर तुम्ही फक्त चुळा भरल्यात तरी चालते. तर ब्रश करताना दातांवर खूप जास्त जोर न देता हलक्या हाताने ब्रश करायला हवा असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे हिरड्या आणि दात खराब होण्याची शक्यता असते.
आपण कुठे चुकतो?
इतकेच नाही तर अनेकांना बेड टी घेण्याची सवय असते. म्हणजे सकाळी उठल्यावर ब्रश न करताही बरेच जण चहा किंवा कॉफी घेतात. यामुळे आपल्या तोंडातील लाळ पोटात जाते आणि ती आरोग्यासाठी चांगली असते असा आपला समज असतो. मात्र प्रत्यक्षात तसे नसते, झोपेत आपले तोंड बंद असते आणि त्यावेळी तोंडात काही बॅक्टेरीयांची निर्मिती झालेली असू शकते. त्यामुळे ब्रश केल्यानंतरच कोणतीही गोष्ट खायला-प्यायला हवी. याशिवाय रात्री झोपताना मात्र आवर्जून ब्रश करायला हवा. कारण दिवसभर आपण जे काही खातो त्याचे कण दातात अडकलेले असण्याची शक्यता असते. ते निघावेत आणि दात किडू नयेत म्हणून रात्री झोपताना आवर्जून ब्रश करायला हवा.