Join us   

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती? डॉक्टर सांगतात, आजारांपासून सुटका हवी तर…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2023 11:17 AM

Know Perfect Time and Method of Drinking Water : योग्य वेळी, योग्य पद्धतीने पाणी प्यायले तर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

पाणी हे आपल्या संपूर्ण आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. आपल्या शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असतो हे आपल्याला माहित आहे. खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होण्यासाठी आणि त्याचे रक्तात रुपांतर होण्यासाठी पाण्याची महत्त्वाची भूमिका असते. म्हणूनच पाणी पिण्याचे प्रमाण, पद्धत, वेळा यांबाबत योग्य ती काळजी घ्यायला हवी. योग्य वेळी, योग्य पद्धतीने पाणी प्यायले तर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. पण हेच पाणी चुकीच्या पद्धतीने प्यायले गेले तर मात्र आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. डॉ. प्रियांका त्रिवेदी पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स आपल्याशी शेअर करतात. पाहूयात त्या नेमकं काय सांगतात (Know Perfect Time and Method of Drinking Water)...

१. पाणी योग्य पद्धतीने प्यायले तर आरोग्य उत्तम राहते पण यामध्ये काही गडबड झाली तर पोटाच्या समस्या, अॅसिडीटी, शरीराच्या तापमानात बदल होणे, हॅमरेज, सांधेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. 

(Image : Google)

२. सकाळी उठल्या उठल्या २ ग्लास पाणी अवश्य प्या. २ ग्लास शक्य नसेल तर किमान १ ग्लास आवर्जून प्यायलाच हवे. शक्य असेल तर कोमट पाणी नाहीतर सामान्य तापमानाचे पाणी प्यायला हवे. गार पाणी सकाळी अजिबात पिऊ नये.

३. कोणत्याही खाण्याच्या म्हणजेच ब्रेकफास्ट, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण करण्याच्या आधी अर्धा तास १ ग्लास पाणी आवर्जून प्यायला हवे. यामुळे पोटात तयार झालेले अॅसिड खाली जाण्यास मदत होते. त्यामुळे अन्न खाल्ल्यानंतर त्याचे योग्य त्या प्रमाणातच अॅसिड तयार होते. यामुळे अॅसिडीटी आणि गॅस्ट्रीक प्रॉब्लेम होत नाहीत. 

४. तसेच चहा किंवा कॉफी पिण्याच्या आधी अर्धा ग्लास पाणी आवर्जून प्यायला हवे. त्यामुळे अॅसिडीटी वाढणार नाही. 

५. आंघोळीला जाताना आणि आंघोळीनंतर अर्धा ग्लास पाणी जरुर प्यायला हवे. यामुळे शरीराचे तापमान कधीच असंतुलित होणार नाही. 

६. तसेच रात्री झोपतानाही १ ग्लास पाणी पिऊन झोपावे. तसेच पाणी कायम बसून ग्लासने प्यावे.   

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलपाणी