Join us   

दिवसभरात पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात, 'या' वेळेला पाणी प्याल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2024 12:19 PM

Know the best times to drink water : योग्य वेळी योग्य पद्धतीने पाणी प्यायले तर त्याचा शरीराला जास्त फायदा होतो.

पाणी हा आपल्या आयुष्याचा अतिशय अविभाज्य भाग आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग ज्याप्रमाणे ७० टक्के पाण्याने व्यापलेला आहे, त्याचप्रमाणे शरीराच्या ७० टक्के भागात पाणी असते. आपण दिवसभर खात असलेले अन्न नीट पचावे आणि त्याचे रक्तात रुपांतर व्हावे यासाठी पाण्याची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर तापमान जास्त असल्याने आपल्या शरीराला नेहमीपेक्षा जास्त पाण्याची आवश्यकता असते. असे असले तरी दिवसभरात आपण कधी, किती पाणी प्यायला हवे याचे काही एक गणित असते, जे आपल्याला माहित असायला हवे. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा पाणी पिण्याविषयी आपल्याला काही महत्त्वाच्या टिप्स देतात. त्या कोणत्या पाहूया (Know the best times to drink water)..

१. सकाळी उठल्या उठल्या २०० मिलीलिटर कोमट पाणी प्यायला हवे. पोटातले टॉक्सिन्स, अनावश्यक घटक शरीराबाहेर येण्यासाठी त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. या पाण्यात थोडे तूप, लिंबू किंवा चिमूटभर दालचिनी पूड असे काहीही घालू शकता. हे पाणी पिण्याआधी दात आणि जीभ साफ केलेली असेल तर जास्त चांगले. 

(Image : Google)

२. आंघोळ करण्याच्या आधी १ ग्लास पाणी आवर्जून प्यायला हवे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच शरीर शांत आणि थंड राहण्यास याचा चांगला फायदा होतो. 

३. प्रत्येक जेवणाच्या किंवा खाण्याच्या आधी अर्धा तास १ ग्लास पाणी प्यायला हवे. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते आणि शरीर जेवण घेण्यासाठी तयार होते. तसेच यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. 

४. जेवताना अजिबात पाणी पिऊ नये. कारण त्यामुळे शरीरात अन्नापासून तयार झालेला पाचन रस निघून जातो. म्हणून जेवण झाल्यावर साधारण ३० मिनीटांनी पाणी प्यायला हवे. 

५. झोपताना आवर्जून ग्लासभर पाणी प्यायला हवे. त्यामुळे कार्डीअॅक अरेस्टची शक्यता कमी होण्यास मदत होते. कार्डीअॅक अरेस्ट साधारणपणे पहाटेच्या वेळात येण्याची शक्यता जास्त असते. पण झोपताना पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी चांगली राखली जाते आणि रक्तदाब कमी राहण्यास मदत होते. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलपाणीआहार योजना