Join us   

‘हे’ ६ रंग तुमच्या रोजच्या जेवणात आहेत का? आजारी पडायचं नसेल तर जेवा कलरफुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2024 10:16 AM

Know Why to eat colorful fruits and vegetables : रंगांना पाहून आपल्याला छान तर वाटतेच. पण हेच रंग आपल्या आहारातही अतिशय महत्त्वाचे असतात.

रंगांमुळे आपल्या आयुष्याला अर्थ आहे, नाहीतर सगळ्या गोष्टी काळ्या आणि पांढऱ्या असत्या तर आपल्याला त्याचा फारच कंटाळा आला असता. पण निसर्गाने इतक्या सुंदर रंगांची निर्मिती केली असल्याने आपले आयुष्य खऱ्या अर्थाने रंगबिरंगी झाले आहे. पक्षी, प्राणी, फळं, भाज्या, आकाश यांमध्ये निसर्गाने केलेली रंगांची उधळण अनेकदा आपल्याला आश्चर्य वाटावे इतकी सुंदर असते. या रंगांना पाहून आपल्याला छान तर वाटतेच. पण हेच रंग आपल्या आहारातही अतिशय महत्त्वाचे असतात. प्रत्येक रंगाच्या फळांचे आणि भाज्यांचे काही महत्त्व असते. प्रत्येक रंगाची फळं आणि भाज्या यांमध्ये आरोग्याला उपयुक्त असे घटक असतात ज्यामुळे शरीराला आवश्यक ते घटक मिळण्यास मदत होते. पाहूयात आरोग्यासाठी प्रत्येक रंगाचे महत्त्व (Know Why to eat colorful fruits and vegetables)...

१. पिवळा रंग

पिवळ्या रंगाची फळं आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने शरीर डिटॉक्स होण्यास याची चांगली मदत होते. यामध्ये केली, मक्याचे कणीस, लिंबू, मोसंबी, आंबा, पिवळी सिमला मिरची या गोष्टींचा समावेश होतो. 

२. केशरी रंग 

यातील बिटा केरोटीनमुळे डोळे आणि त्वचा चांगली राहण्यास मदत होते.यात गाजर, लाल भोपळा, आंबा, रताळी, जरदाळू आणि पपई या गोष्टींचा समावेश होतो. 

३. हिरवा रंग

हिरव्या रंगाची फळं आणि भाज्या यामध्ये फोलेट असते. ज्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, शिमला मिरची, फरसबी, पेरू, किवी, कोबी या हिरव्या गोष्टींचा आहारात जास्तीत जास्त समावेश करायला हवा. 

४. जांभळा रंग

यातील अंथोसियानिंस हा घटक डायबिटीस आणि लठ्ठपणा या समस्यांवर चांगल्या प्रकारे उपयुक्त ठरतो. वांगी, जांभळा कोबी, जांभूळ, ब्लॅकबेरी यांसारख्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. 

५. लाल रंग 

यात असलेला लयकोपेन हा घटक हृदयाच्या आणि कॅन्सरशी निगडित समस्यांवर उपयक्त ठरतो. कलिंगड, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, बीट, चेरी, सफरचंद आणि लाल शिमला मिरची हे याचे उत्तम स्रोत आहेत. 

 

६. पांढरा रंग

पांढऱ्या रंगात अलिसिन नावाचा घटक असतो. ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. फ्लॉवर, लसूण, कांदा, काजू, टोफू, बटाटा यांसारख्या भाज्यांचा आहारात समावेश करावा  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफळेभाज्याआहार योजना