Join us   

कृष्णाला आवडणारं पंचामृत जन्माष्टमीला करण्याचं खास महत्त्व! प्रसाद म्हणून पंचामृत नियमित खाण्याचे ५ फायदे…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2023 8:40 AM

Krushna Janmashtami Shrikrishna jayanti Panchamrut Benefits : चामृत चवीला जितके छान लागते तितकेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर असते.

कृष्ण जन्माष्टमी हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी रात्री १२ वाजता श्रीकृष्णाची पूजा करण्यात येते. भगवान श्रीकृष्णाच्या आठव्या अवताराने या दिवशी जन्म घेतला होता असे मानले जात असल्याने या दिवशी कृष्णाची भक्तीभावाने पूजा केली जाते. श्रीकृष्णाला दही, दूध, लोणी, तूप हे पदार्थ विशेष आवडत असल्याने त्याला या पदार्थांपासून तयार झालेल्या पंचामृताचा नैवेद्य दाखवण्याची रीत आहे. हा नैवेद्य त्याच्या भक्तांना प्रसाद म्हणून दिला जातो. पंचामृत म्हणजे पाच अमृतासमान असलेल्या गोष्टींचे मिश्रण असते (Krushna Janmashtami Shrikrishna jayanti Panchamrut Benefits). 

आपल्याकडे सत्यनारायण पूजा, गणपती किंवा कोणतेही शुभ कार्य असेल तरी आवर्जून पंचामृत केले जाते. हे पंचामृत चवीला जितके छान लागते तितकेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर असते. यामध्ये दही, दूध आणि मध यांसारखे पदार्थ वापरण्यात येतात, हे पदार्थ अँटीबॅक्टरीयल असल्याने कोणत्याही इन्फेक्शनपासून आपला बचाव करण्यासाठी या पंचामृताचा चांगला फायदा होतो. पाहूयात हे पंचामृत कसे तयार करायचे आणि ते खाण्याचे शरीराला कोणते फायदे मिळतात. 

पंचामृत तयार करण्याची पद्धत

(Image : Google)

एका भांड्यात अर्धी वाटी दही, अर्धी वाटी दूध, २ चमचे मध, २ चमचे तूप आणि साधारण १ चमचाभर साखर घालायची. हे मिश्रण चांगले एकत्र करुन घ्यायचे आणि त्यामध्ये तुळशीची ४ ते ५ पाने घालायची. काही वेळ हे पंचामृत झाकून ठेवायचे म्हणजे ते चांगले मुरते आणि एकजीव होते. 

पंचामृताचे फायदे

१. गर्भवतींसाठी फायदेशीर

पंचामृत म्हणजे एक गोड मिश्रण असते जे गरोदर स्त्रीला पोषक तत्व प्रदान करू शकते. हे बाळाच्या विकासात मदत करते. यामुळे आईच्या स्नायूंना मदत मिळते आणि तिची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. या सोबतच गरोदरपणात पंचामृताचे सेवन केल्याने स्त्री रिलॅक्स आणि स्वस्थ राहते. 

२. पचनक्रियेसाठी उपयुक्त

पंचामृत हे पचन तंत्राला मजबूत करते. ज्यामुळे अ‍ॅसिडीटी, पोटाच्या व आतड्यांच्या समस्या तसेच अल्सर पासून सुद्धा आराम मिळतो. ज्यांची पचनशक्ती काही कारणाने क्षीण झालेली असते अशांनी आवर्जून पंचामृत घ्यावे. 

३. तरतरी येण्यास मदत

पंचामृत शरीराला ताकद देणाऱ्या सात उतींना पोषण देते ज्यात प्रजनन उती, दात, फॅटी टिश्यू, नार्व टिश्यू, मसल टिश्यू, प्लाझ्मा आणि रक्त पेशींचा समावेश होतो. त्यामुळे थकवा आला असेल किंवा अंगात ताकद नसेल तर नियमितपणे पंचामृत घ्यावे. 

(Image : Google)

४. बुद्धी तल्लख होण्यास मदत

पंचामृताचे सेवन आपण मुख्यतः पूजेच्या वेळी करतो. पण पंचामृताचं सेवन नियमितपणे केल्यास बुद्धी तल्लख होते आणि स्मरणशक्तीही वाढते. म्हणून गर्भवतींना आवर्जून पंचामृत दिले जाते, जेणेकरुन होणाऱ्या बाळाची बुद्दी तल्लख होईल.

५. त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त 

पंचामृत हे तुमच्या त्वचेसाठी एखाद्या क्लिंजरप्रमाणे काम करते. पंचामृताच्या सेवनाने तुमची त्वचा निरोगी राहते आणि स्कीन सेल्सच्या विकासालाही मदत मिळते, त्यामुळे त्वचेवर आपोआपच ग्लो येतो. पंचामृत खाल्ल्याने केस निरोगी आणि चमकदार होतात. तसेच काही कारणाने केसांची वाढ खुंटली असेल तर ती सुरळीत होण्यास मदत होते.    

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नजन्माष्टमी