डॉ. देविका दामले
डोळ्यांच्या उपचारातील लेझर उपचार हा एक महत्त्वाचा भाग आहे. या लेझर उपचारांमुळे डोळ्यांच्या समस्या दूर होणे सोपे झालेच पण अगदी कमी वेळात नेमकेपणाने हे उपचार करणे शक्य झाले. आता लेझर उपचार म्हणजे काय? त्याचा खरंच फायदा होतो का, डायबिटीक रेटीनोपॅथीसाठी याचा खरंच उपयोग होतो का असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात. त्याच प्रश्नांची थोडक्यात आणि सोप्या शब्दात उत्तरे देण्याचा प्रयत्न (Laser Treatment On Diabetic Retinopathy)...
रक्तातील शुगर सतत वाढते? डोळे जपा, तज्ज्ञ सांगतात, डायबिटीक रेटीनोपॅथी होण्याचा धोका...
लेझर उपचार म्हणजे काय ?
लेझर उपचार म्हणजे रेटिनाच्या अकार्यक्षम भागाला लेझरचा शेक देऊन त्या अकार्यक्षम भागाला रोखणे. यामुळे रेटिनाची अजून खराबी टाळायला मदत होते. तसेच यामुळे पुढे जाऊन रेटिना व डोळ्यांच्या आतल्या भागातील रक्तस्त्राव आणि पडदा निसटण्याचा संभाव्य धोका कमी होण्यास मदत होते. तसेच पडदयावर रक्ताचे व प्रथिनांचे पिवळे पडण्याचे प्रमाणही कमी होते. लेझरमुळे रेटिनावर सूज येण्याचा धोका कमी होतो. म्हणजेच लेझर केल्याने डायबेटिक रेटिनोपथीमुळे नजर कमी होणारे संभाव्य धोके टाळायला मदत होते.
लेझर उपचारामुळे नजर सुधारते का? यामुळे डायबेटिक रेटिनोपथी पूर्ण बरी होते का ?
लेझर उपचार हा नजर सुधारण्यासाठी नाही तर आहे तेवढी नजर वाचवण्यासाठी उपयुक्त ठरतो. डोळ्यांची आहे त्याहून जास्त खराबी होण्यापासून वाचवण्यासाठी हा उपाय फायदेशीर असतो. लेझर उपचारानंतर आधीपासून डोळ्यांपुढे असणारे काळे ठिपके कमी होत नाहीत. फक्त ते अजून वाढू नयेत यासाठी हे उपचार गरजेचे असतात. डोळ्यांमध्ये होत असलेला रक्तस्राव निघून जाण्यासाठी लेझर काम करत नाही. पण जी डोळ्यांची स्थिती आहे त्यापेक्षा ती खराब होऊ नये यासाठी लेझर फायदेशीर ठरते. लेझर केल्यानंतरही रुग्णांच्या शरीर संरचनेनुसार आणि रक्तशर्करेच्या अनियंत्रित प्रमाणामुळे डोळ्याची स्थिती अजून खराब होण्याचा धोका काही प्रमाणात असतो.
डायबिटीसमुळे वाढतात डोळ्यांच्या समस्या, वेळीच काळजी घ्या, नाहीतर..तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
लेझरनंतर नजर कमी होते, यात कितपत तथ्य आहे?
लेझर केल्या केल्या काही तासांपुरती काही रुग्णांची नजर कमी होऊ शकते. रात्री अंधारात दिसण्यास त्रास होणे व दृष्टीक्षेत्र कमी होणे असे परिणाम दिसून येतात. लेझर केल्यावरही काही थोड्या रुग्णांमधे डोळ्यांच्या आत रक्तस्राव होणे व पडदा निसटणे अशा कारणांमुळे नजर कमी झालेली आढळून येते.
लेखिका नेत्रतज्ज्ञ आहेत.
devikadamle@gmail.com