एव्हाना दिवाळीची धामधूम सुरु झाली आहे. जवळपास आठवडाभर सुरू असणाऱ्या या सणाच्या प्रत्येक दिवसाची काही ना काही खासियत असते. लक्ष्मीपूजन, धनत्रयोजशी झाल्यानंतर येतो तो दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. आपल्याकडे प्रत्येक ऋतूमध्ये येणाऱ्या सणाला त्या त्या ऋतुनुसार आहार-विहास सांगितला आहे. दिवाळीत ज्याप्रमाणे शरीराला स्निग्धता मिळण्यासाठी फराळाचे पदार्थ केले जातात. त्याचप्रमाणे धनत्रयोजशीला गूळ आणि धणे यांचा नैवेद्य दाखवण्याची रीत आहे तर लक्ष्मीपूजनाला घरोघरी लक्ष्मीची, धनाची पूजा केली जाते. यावेळी साळीच्या लाह्या आणि बत्तासे यांचा नैवेद्य दाखवला जातो. नंतर हा नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सगळ्यांना दिला जातो (Laxmipujan Diwali Salichya lahya importance and benefits for health).
आता साळीच्या लाह्याच का? तर साळीच्या लाह्यांमध्ये असणारे गुणधर्म थंडीच्या दिवसांत शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. थंडीच्या काळात उद्भवणाऱ्या तक्रारींसाठी साळीच्या लाह्या औषधाप्रमाणे काम करतात. साळीच्या लाह्यांचे पाणी पिणे, साळीच्या लाह्यांचा चिवडा अशा अनेक फॉर्ममध्ये या लाह्या खाता येतात. साळीच्या लाह्यांना सलाईन म्हणून ओळखले जाते. बाराही महिने कोणत्याही वयाच्या व्यक्तीने खाल्ल्या तरी चालतील अशा लाह्या अतिशय आरोग्यदायी असतात. मात्र थंडीत आवर्जून साळीच्या लाह्या खाण्याचे फायदे कोणते ते पाहूया..
१. कफविकारासाठी उत्तम - थंडीच्या दिवसांत सर्दी - कफ यांसारखे त्रास उद्भवतात. अशावेळी साळीच्या लाह्या खाल्ल्यास कफ कमी होण्यास मदत होते. त्यामुळे लगेचच औषधे घेण्यापेक्षा हा पारंपरिक घरगुती उपाय केव्हाही जास्त चांगला. लहान मुलांनाही साळीच्या लाह्या देण्याचा सल्ला अनेकदा घरातील ज्येष्ठ मंडळींकडून दिला जातो.
२. पचनविकार दूर होतात - साळीच्या लाह्या या पचायला अतिशय हलक्या असतात. त्यातील उपयुक्त घटक शरीराच्या पचनसंस्थेसाठी मोलाचे काम करतात. पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी साळीच्या लाह्या खाल्ल्यास त्याचा चांगाल फायदा होतो. अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर या लाह्या औषधाप्रमाणे काम करतात.
३. महिलांच्या समस्यांवर गुणकारी - मासिक पाळीदरम्यान महिलांना पोटदुखी, अंगदुखी, कंबरदुखी असे त्रास होतात. मात्र नियमितपणे साळीच्या लाह्या खाल्ल्यास हे त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतात. PCOS आणि PCOD यांसारखे त्रास असणाऱ्यांनीही लाह्या खाल्ल्यास फायदेशीर ठरतात.
४. सौंदर्यासाठी उपयुक्त - लाह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारून सौंदर्य वाढविण्यासाठीही लाह्या खाणे फायदेशीर आहे. साळीच्या लाह्यांची पावडर दुधात मिसळून त्वचेवर लावली तर तो एक उत्तम फेसपॅक होतो. त्यामुळे चेहऱ्यावरचे फोड, वांगाचे डाग, सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.