जास्त झोपा काढल्या की वजन वाढतं असा एक समज आहेच. आणि तो खोटाही नसावा. मात्र कमी झोप काढली किंवा झोपेची प्रतच जर बरी नसेल तरी वजन वाढूच शकतं. कदाचित डाएट आणि व्यायाम सांभाळूनही वजनाचा काटा हलत नसेल तर आपल्याकडे वजनाकडे बघा. आता अनेक अभ्यास असं स्पष्ट सांगतात की माणूस किती झोपतो, त्याच्या झोपेचा दर्जा कसा आहे याचा आणि वजन घटण्याचा, न वाढण्याचा थेटच संबंध आहे. अनेकजण आहार सांभाळतात, व्यायाम करतात पण तरी वजन कमी होत नाही? त्याचं कारण कमी झोप, झोपण्यापूर्वी हातात असलेले सेलफोन्स आणि हलते बोलते स्क्रीन हे आहेच. कमी झोपेमुळे तब्येतीचे अनेक प्रश्न निर्माण होता. जीवनशैलीसंबंधित आजार तर होतातच पण मधूमेह, हायपरटेंशन, रक्तवाहिन्यांसंबधी आजार, काही मानसिक आजारही कमी झोप मिळाल्यानं बळावतात. मात्र यासाऱ्यात एक नवीन लक्षणंही समोर आले आहे.
(Image : google)
स्थुलतेसंदर्भात युरेपिअन अभ्यासकांनी नुकताच एक अभ्यास मांडला. त्यांच्यामते, वजन कमी न होण्याचा थेट संबध कमी झोप किंवा कमी गुणात्मक झोप यांच्याशी आहे. आहार उत्तम घेतला तरी झोप बरी नसेल तर वजन घटण्याचा वेग मंदावतो. आठवड्याला दोन तास दणकून व्यायाम केला तर झोपेचा दर्जाही सुधारतो आणि त्यामुळे वजनही लवकर कमी होऊ शकते. मानसोपचार तज्ज्ञही या अभ्यासाचं समर्थन करतात. त्यांच्यामते घ्रेलीन हे मानवी शरीरात स्त्रवणारे हार्मोन मुख्यत्वे भूक लागल्याची भावना निर्माण करते. जर झोप कमी झाली तर हे हार्मोन जास्त स्त्रवते, भूक लागली आहे, खावंसं वाटतं आहे म्हणून खाणे जास्त सुरु होते. त्याचवेळी लेप्टीन हे दुसरे हार्मोन झोप कमी झाली तरी कमी स्त्रवते. पोट भरलं, आता खाणं थांबवा असं सांगणारं हे हार्मोन, ते कमी स्त्रवते त्यामुळे खाणं थांबत नाही. जास्त खाणं सुरुच राहतं. आणि त्याचा परिणाम म्हणून खाणं वाढतं. वजन कमी करणाऱ्यांचं वजन तर कमी होत नाहीच पण वजन वाढीचाही धोका त्यामुळे बळावतो. झोप कमी झाल्याचा दुसरा परिणाम म्हणजे थकल्यासारखं वाटतं, आळस येतो. फटीग वाढतो. त्यामुळे शारीरिक हालचाली आणखी मंदावतात त्यामुळेही वजनवाढ होते. त्यामुळे आपल्या झोपेकडे वेळीच लक्ष दिलेलं बरं..