बीपी म्हणजेच रक्तदाब ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. बीपी हाय होणे आणि लो होणे या समस्या अगदी कमी वयात सतावते. बीपी कमी जास्त झाला की होणारी अस्वस्थता आणि त्याचे हृदय, मेंदू, किडनी यांसारख्या अवयवांवर होणारे परिणाम धोकादायक असतात. त्यामुळे हा बीपी नियंत्रणात ठेवणे अतिशय आवश्यक असते. डॉक्टर बीपी वाढत असेल तर किंवा कमी होत असेल तर औषधे देतात, त्यामुळे तो नियंत्रणात राहतोही. (lifestyle Changes to Maintain BP) पण औषधांबरोबरच आपण काही घरगुती उपाय केले तर त्याचा निश्चितच फायदा होतो. आपला आहार-विहार, जीवनशैली यावरही खूप गोष्टी अवलंबून असतात. पाहूयात बीपी कमी करण्यासाठी घरगुती उपाय...
१. कॅफीनचे सेवन
आपल्यातील अनेकांना कामातून ब्रेक म्हणून चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते. पण सतत प्रमाणाबाहेर चहा-कॉफी घेतल्यास त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. चहा-कॉफी खूप जास्त प्रमाणात घेतल्यास बीपी कमी जास्त व्हायची शक्यता असते. त्यामुळे कंटाळा आला म्हणून तुम्ही सहज चहा-कॉफी घेत असाल तर त्याचं प्रमाण नियंत्रणात आणायला हवं.
२. मीठ
बीपी असणाऱ्यांनी मीठ आणि मीठ असलेल्या पदार्थांवर नियंत्रण ठेवायला हवे हे आपण अनेकदा वाचतो आणि ऐकतो. पण प्रत्यक्षात मीठ हा आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे थोडे कठीण असते. मात्र अशावेळी पदार्थांवर वरुन मीठ घेणे टाळावे, लोणचे, पापड, नमकीन पदार्थ खाणे आवर्जून टाळायला हवे.
३. ताणरहीत राहणे महत्त्वाचे
बीपीचा आपल्या शारिरीक गोष्टींबरोबरच मानसिक आरोग्याशीही संबंध असतो. आपल्या प्रत्येकालाच रोजच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टींचे ताण असतात. पण याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्याला ताण कमी करुन आनंदी राहायचे असेल आणि तब्येतही चांगली ठेवायची असेल तर ताण न घेता शांत आणि आनंदी राहणे महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्यायला हवे.
४. झोप
झोप हा आपल्या जीवनशैलीतील अतिशय महत्त्वाचा मुद्दा असून आपली झोप चांगली होत असेल तर आपले आरोग्य चांगले राहायला मदत होते. ज्यांची झोप कमी होते त्यांना बीपीचा त्रास होण्याची शक्यता असते असे काही संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे नियमीत पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.
५. व्यायाम
आपल्याला रोजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम करायला वेळ होत नाही असे कारण आपण नेहमी देतो. पण १५ मिनीटे चालणे, सूर्यनमस्कार, बेसिक स्ट्रेचिंग किंवा योगा आणि ध्यान या गोष्टी आपण दिवसभरात जमेल त्या वेळात नक्की करु शकतो. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहायला मदत होते आणि बीपी, डायबिटीस, हृदयरोग अशा जीवनशैलीशी निगडित समस्या दूर होण्यास मदत होते.