नवीन वर्ष सुरू झालं की आपण सगळेच काही ना काही संकल्प करतो. कधी हे संकल्प व्यायामाचे असतात, कधी आरोग्य चांगले ठेवायचे असतात तर कधी आणखी काही गोष्टी साध्य करण्याचे असतात. पण ‘सीर सलामत, तो पगडी पचास’ याचप्रमाणे आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपले सगळे संकल्प तडीस जाणे शक्य आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते (Lifestyle Diet Tips For Good Health Throughout The Year).
व्यायाम आणि आहार या २ अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असून त्याकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी नवीन वर्षात आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात अशा ३ गोष्टी शेअर करतात. अंजली यांचे इन्स्टाग्रामवर बरेच फॉलोअर्स असून त्या आपल्या फॉलोअर्सना नेहमी काही ना काही उपयुक्त टिप्स देण्याचा प्रयत्न करत असतात. आताही त्यांनी उत्तम आरोग्यासाठी आणि प्रतिकारशक्ती चांगली राहावी यासाठी वर्षाच्या सुरुवातीला ३ महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत, पाहूया त्या कोणत्या...
१. नैसर्गिक स्वरुपातील पदार्थ खा
- फळांच्या ज्यूस ऐवजी ताजी फळे खा
- भाज्या खूप जास्त न शिजवता अर्धवट कच्च्या शिजवा
- गाजर, कोबी, शिमला मिरची यांसारख्या भाज्या नुसत्या फ्राय करा, जेणेकरुन त्या कुरकुरीत राहतील. यामुळे भाज्यांमधील पोषणमूल्ये शरीराला जास्त प्रमाणात मिळण्यास मदत होईल.
२. वजन उचलण्याचे व्यायाम करा
दररोज किमान १५ मिनीटे वजन उचलण्याचा व्यायाम करायला हवा. याशिवाय कार्डीओ आणि योगा अशा दोन्हीचे कॉम्बिनेशन असलेला व्यायामही आवर्जून नियमितपणे करायला हवा.
३. सप्लिमेंटसचा समावेश करा
आहारात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, इ आणि झिंक या व्हिटॅमिन्सचा योग्य प्रमाणात समावेश हवा. या व्हिटॅमिन्समुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असल्याने आहारात त्यांचा समावेश आवर्जून करायला हवा. आपल्या रोजच्या आहारातून सगळी व्हिटॅमिन्स मिळतातच असे नाही, अशावेळी सप्लिमेंटसचा वापर फायदेशीर ठरतो.