संयोगिता ढमढेरे
कोविडमधून बरे झाल्यानंतरही तुम्हाला काही लक्षणं जाणवत असतील तर या प्रकाराला कोविड पश्चात स्थिती किंवा दीर्घ कोविड असं म्हंटलं जातं. श्वास घ्यायला त्रास होतोय, कार्यक्षमता कमी होतेय आणि मेंदू फार काम करत नाही किंवा थकवा येतोय. सर्वात जास्त लोकांना ही तीन मुख्य लक्षणं जाणवत आहेत हे खरं असलं तरी कोविड रुग्णांमध्ये अशी २०० हून जास्त लक्षणं आढळून आली आहे. यात छातीत दुखणं, बोलायला त्रास होणं, चिंता वाटणं आणि औदासिन्य येणं, स्नायूदुखी, ताप, वास न येणं, तोंडाची चव जाणं ही त्यापैकी काही लक्षणं आहेत. ही यादी खूप लांब असली तरी श्वासोच्छवासला त्रास, कार्यक्षमता कमी होणं, मेंदू आणि शरीराला थकवा ही तीन प्रमुख कारणं आहेत.
ही लक्षणं किती दिवस आढळतात ते आजून निश्चित झालेलं नाही. काहींमध्ये ही लक्षणं तीन महिने, सहा महिने, नऊ महिन्यांपर्यंत आढळून आली आहेत. कोरोना येऊन आता दीड वर्षच झालं असल्याने ही लक्षणं किती काळ दिसू शकतात याबद्दल आताच निश्चित काही सांगता येणार नाही. कोविड पश्चात रुग्णांवर होणारे परिणाम याबाबत अधिक अभ्यास होण्याची गरज आहे. त्यावरून ही लक्षणं कशामुळे आणि कधी लोप पावतात हे कळू शकेल.
या लक्षणांवर काही उपचार आहेत का? कोणते उपचार उपलब्ध आहेत?
त्यावर एक उत्तर आहे की अशी लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांकडे जायला हवं. आपल्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टरकडे जाण्याबरोबर जो त्रास होत आहे त्या आजारांच्या विशेषज्ञ, मानसोपचारतज्ञ आदींचा सल्ला घ्यावा. कारण ही लक्षणं कुणाला का उत्पन्न होतात त्यामागची कारणं अजून स्पष्ट झालेली नाहीत. त्यावर वेळेवर उपाय व्हायला हवेत.
लस घेण्याचा कोविड पश्चात लक्षणांवर काही परिणाम होतो का याबद्दलही अजून बराच अभ्यास व्हायचा आहे. कोविडला रोखण्यात म्हणजेच त्यानंतर येणाऱ्या कोविड पश्चात लक्षणांना किंवा दीर्घ कोविडला रोखण्यासाठी कोविड लस घेणं हाच उत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. लस घेतल्याने रूग्णालयात भरती व्हावं लागत नाही. तीव्र लक्षणं आणि जास्त दिवस रुग्णालयात उपचार घ्याव्या लागलेल्या व्यक्तीना दीर्घ कोविड होण्याची शक्यता जास्त असते. लसीमुळे कोविडची लागण झाली तरी मृत्यू येण्याचा धोका कमी होतो. त्याप्रमाणे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि सार्वजनिक ठिकाणी शरीर अंतर राखणं हेही खूप उपयोगी आणि महत्वाचं आहे.
(छायाचित्र : गुगल)
कोरोना आणि मधूमेह
कोविड लागणीचा सर्वात जास्त धोका असलेल्या लोकांमध्ये मधुमेही लोकांचा क्रमांक सर्वात वर आहे त्यामुळे या काळात त्यांच्यावर निरोगी राहण्याचं आणि स्वत:चा बचाव करण्याचं सर्वात जास्त दडपण आहे. ज्यांना मधुमेह आहे हे माहीत आहे त्या लोकांना तरी स्वत:ची काय काळजी घ्यावी याची माहिती आहे परंतु जेवढ्या लोकांना मधुमेह आहे त्यापैकी निम्म्या लोकांना आपल्याला मधुमेह आहे याची कल्पनाही नाही. कारण त्यांची तपासणीच झालेली नाही आणि ज्यांना माहीत आहे त्यांनाही हवी असलेली औषधं आणि आरोग्य सेवा मिळतातच असं नाही.
१. या महामारीत मधुमेह असलेल्या व्यक्तीना मधुमेह नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत कोरोनाची तीव्र लागण होण्याचा आणि त्यामुळे मृत्यू येण्याची शक्यता जास्त आहे हे आता आपण सर्व जाणतोच.
२. मधुमेह प्रकार २ पेक्षा प्रकार १ असेलेल्या लोकांना हा धोका जास्त असतो. भारतात प्रकार दोनचे रुग्ण जास्त आहेत. तरीही त्यांनी योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.
३. या महामारीच्या काळात शारीरिक व्यायाम आणि पोषक आहार या मधुमेहींसाठी अत्यंत आवश्यक बाबींची पूर्तता करणं खूपच आव्हानात्मक काम आहे. महामारीचे निर्बंध आणि मर्यादा सांभाळून व्यायाम आणि आहाराच्या नियमनात सातत्य ठेवण्यासाठी या व्यक्तींनी नवनवीन पर्याय शोधले पाहिजेत.
४. तसंच या व्यक्तीना आवश्यक औषधं मिळतील याची आरोग्य यंत्रणेने ग्वाही दिली पाहिजे. मधुमेही व्यक्तीना असलेला कोविड लागणीचा आणि त्यामुळे मृत्यू येण्याचा धोका ओळखून या व्यक्तींनी कोविड सुसंगत वर्तनाचं काटेकोर पालन करायला हवं आणि त्यांना प्राधान्यक्रमाने लस मिळायला हवी.
(जागतिक आरोग्य संघटनेच्या सौजन्याने - ‘कोविड सुसंगत वर्तन उत्तेजन आणि लस संकोच निर्मुलन’ डीएलए फाउंडेशन आणि युनिसेफचा संयुक्त उपक्रम)