कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवणे खूप गरजेचे होते. त्यामुळे प्रत्येकजण आराेग्याबाबत सजग झालेला होता. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दोन व्हिटॅमिन्स अत्यंत उपयुक्त आहेत. यापैकी एक म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असणारे व्हिटॅमिन सी आणि दुसरे म्हणजे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी ला the sunshine vitamin असे म्हणूनही ओळखले जाते. कारण सुर्याचा कोवळा प्रकाश हा व्हिटॅमिन डी चा सर्वोत्तम स्त्रोत आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाेबतच शरीराचे सर्व कार्य योग्य आणि सुरळीत पद्धतीने चालण्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच व्हिटॅमिन डी मुळे हाडांना बळकटी मिळते आणि काही प्रकारचे कर्करोग होण्याचा धोकाही कमी होतो.
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होणारे आजार
- व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे श्वसन यंत्रणेच्या कार्यात देखील अडथळा येतो. व्हिटॅमिन डी ची खूप जास्त कमतरता असेल तर अशा रूग्णांमध्ये न्यूमोनिया होण्याचा धोका अधिक असतो. किंवा या रुग्णांच्या श्वसनसंस्थेच्या वरच्या भागात संसर्ग होऊन श्वसनास अडथळा होऊ शकताे.
- ज्या व्यक्ती स्थूल आहेत आणि ज्यांना मधुमेह आहे, अशा व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याचे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. अशा प्रकारात मोडणाऱ्या ज्या व्यक्तींना कोरोनाचा अधिक प्रमाणात संसर्ग झाला होता, असेही काही अभ्यासांतून मांडले गेले आहे.
- व्हटॅमिन डी च्या कमतरतेमुळे रक्तदाबाचा धोकाही संभवतो.
- खूप जास्त घाम येत असेल, थंड वातावरणातही कपाळावर घाम दिसत असेल, तर याचे एक कारण व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते.
- व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे नैराश्य येते आणि लहानसहान गोष्टींचा मानसिक त्रास होऊ लागतो. अस्वस्थता वाढते.
- अशक्तपणा जाणवतो आणि थोडेसे काम केले तरी थकवा येतो.
- केस अकाली पांढरे होणे आणि खूप गळू लागणे.
- वारंवार सर्दी, पडसे, कफ होणे हे देखील व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे लक्षण आहे.
- व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होऊन सांधेदुखीचा त्रास होतो.
तुमची जीभही सांगते व्हिटॅमिन डी ची कमतरता
- काही अभ्यासानुसार असेही सिद्ध झाले आहे की तुमच्या शरीरात व्हीटॅमिन डी ची कमतरता आहे की नाही, हे तुमची जीभ पाहूनही सांगता येते.
- व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे Burning Tongue Syndrome or Burning Mouth Syndrome जाणवू लागतो.
- या आजारात तोंड कायम आलेले असते आणि तुमच्या तोंडात कायम आग, वेदना होत असतात.
- जीभेची चव जाणे, जीभेवर बारीक बारीक पुरळाप्रमाणे फोडं येणे, ही देखील व्हिटॅमिन डी ची कमतरता दाखवणारी लक्षणे आहेत.
- केवळ जीभेवरच नाही, तर ओठांवर देखील हा त्रास जाणवतो.
- त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचा त्रास जाणवत असेल, तर सगळ्यात आधी डॉक्टरांशी संपर्क करून ब्लड टेस्ट करून घेणे कधीही उत्तम.
व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी काय करावे?
- आपल्याला माहितीच आहे की सुर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी पुरविणारा सगळ्यात उत्तम स्त्रोत आहे.
- त्यामुळे सकाळचे कोवळे उन १० ते १५ मिनिटांसाठी तुमच्या अंगावर घेणे हा सगळ्यात सोपा आणि तेवढाच फायदेशीर पर्याय तुम्ही निवडू शकता.
- चेहरा, हात, पाय, पाठ या सगळ्या भागावर सुर्यप्रकाश पडेल याची काळजी घ्यावी.
- दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचे सेवन वाढवावे.
- अंड्यांचा पांढरा भाग देखील व्हिटॅमिन डी चा चांगला स्त्रोत आहे.
- मशरूम खाल्ल्यानेही योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते.
- टोफू आणि सोयाबीन यासारखे सोया फूडदेखील व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करते.