Join us   

वजन कमी करायचं, पोटाचं-हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचं तर न चुकता खा ५ गोष्टी, राहाल ठणठणीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2022 5:12 PM

Lovneet Batra Diet Tips For Good Health : कोणत्या पदार्थांतून आपल्याला जास्त प्रमाणात फायबर्स मिळतील याविषयी लवनीत बत्रा काही महत्त्वाच्या टिप्स देतात.

ठळक मुद्दे हाडे बळकट होण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि हृदयाचे कार्य सुरळीत होण्यासाठी अंजीर फायदेशीर असते.  आपल्या आहारात दररोज ३० ग्रॅम फायबर असायला हवेत असं आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा सांगतात.

तब्येत चांगली ठेवायची तर आहारात सगळ्या घटकांचा योग्य त्या प्रमाणात समावेश असायला हवा. आपण नेहमी प्रोटीन इनटेक वाढवला तर आरोग्य चांगलं राहायला मदत होते, जीवनसत्त्वाचे प्रमाण योग्य हवे असे काही ना काही ऐकत असतो. त्याचप्रमाणे आरोग्याच्या विविध तक्रारी दूर करण्यासाठी फायबर्स अतिशय आवश्यक असतात. आहारात फायबर्सचा समावेश वाढवल्यास पोटाचं आरोग्य चांगलं राहण्यास तर मदत होतेच, पण हृदयाचं कार्य सुरळीत होण्यासाठीही त्याचा फायदा होतो. इतकंच नाही तर वाढत्या वजनाची समस्या हा सध्या अनेकांना भेडसावणारा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठीही आहारात फायबर्सचा समावेश उपयुक्त ठरतो. आपल्या आहारात दररोज ३० ग्रॅम फायबर असायला हवेत असं आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा सांगतात. आता फायबरचा समावेश वाढवायचा हे ठिक आहे, पण त्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा आणि कोणत्या पदार्थांतून आपल्याला जास्त प्रमाणात फायबर्स मिळतील याविषयी लवनीत बत्रा काही महत्त्वाच्या टिप्स देतात (Lovneet Batra Diet Tips For Good Health). 

(Image : Google)

१. पेर 

पेर हे अतिशय उत्तम फळ असून त्यामध्ये फायबर्सचे प्रमाण चांगले असते. आपण साधारणपणे सफरचंद खातो पण पेर फारसे खात नाही. पण पेर नियमितपणे खाल्ल्यास शरीराला फायबर मिळून शरीराचे कार्य चांगले होण्यास मदत होते. एका मध्यम आकाराच्या पेरात ५.५ ग्रॅम फायबर्स असतात. 

२. गव्हाचा कोंडा 

अनेकांना गहू दळून आणले की पीठ चाळून घेण्याची सवय असते. मात्र त्यामुळे त्यातील कोंडा वाया जातो. म्हणून असे न करता गव्हाचा कोंडा पीठात आहे तसाच ठेवायला हवा. या कोंड्यामध्ये फायबर असल्याने त्याचा आरोग्याला चांगला उपयोग होतो. 

३. राजमा

राजमा हा उत्तरेकडे खाल्ला जाणारा अतिशय प्रसिद्ध पदार्थ असून त्याठिकाणी राजमा चावल, राजमा ग्रेव्ही हे पदार्थ प्रसिद्ध आहेत. राजमामध्ये फायबर्सचे प्रमाण चांगले असून तुम्ही नियमितपणे आहारात त्याचा समावेश करु शकता. 

४. चिया सीडस 

चिया सीडसचे आरोग्यासाठी बरेच उपयोग असून आपण सहसा याचा आहारात समावेश करत नाही. मात्र दूधातून, पाण्यातून किंवा शेक, फालुदा यांसारख्या गोष्टींमधून चिया सीडस आहारात घ्यायला हव्यात. ब्रेकफास्टमध्येही सलाडमध्ये यांचा आवर्जून वापर करता येऊ शकतो. रात्रभर पाण्यात भिजवलेले चिया सीडस आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

५. सुके अंजीर 

अंजीर हे फळ एकूणच शरीराला पोषण देणारे असते. त्यातही सुके अंजीर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. यामध्ये खनिजे, फायबर्स, व्हिटॅमिन्स अशा सगळ्याच गोष्टी चांगल्या प्रमाणात असल्याने नियमितपणे अंजीर खायला हवे. हाडे बळकट होण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि हृदयाचे कार्य सुरळीत होण्यासाठी अंजीर फायदेशीर असते.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना