बी १२ आणि व्हिटॅमिन डी कमी असणे ही अत्यंत कॉमन समस्या आहे. थकवा येतो, चिडचिड होते, मूड जातो, हाडं दुखतात अशा तक्रारी घेऊन अनेकजणी डॉक्टरकडे जातात तेव्हा डॉक्टर पहिले बी १२ आणि व्हिटॅमिन डी तपासणी करा असं सांगतात. कोरोनाच्या काळात तर अनेकांनी व्हिटॅमिन डीच्या गोळ्या, सॅशे सर्रास घेतले. प्रतिकार शक्ती वाढवायची म्हणून व्हिटॅमिन डीची गोळी देण्यात आली. हेच नाही तर कोरोनाकाळात हे वारंवार सांगण्यात आलं की रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवायची तर आपल्या शरीरात ड जीवनसत्त्वं पुरेसं असणं गरजेचं आहे. याशिवाय अंगदुखी, केस गळणं या समस्याही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमूळे निर्माण होतात. आणि यासाऱ्याला जबाबदार कोण तर भारतासारख्या प्रचंड ऊन पडणाऱ्या देशातही लोक सूर्यप्रकाशात त्यातही सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात जातच नाहीत. ही कमतरता मग अनेक आजारांना आमंत्रण देते आणि त्यातून मग रोगप्रतिकारशक्ती कमी होते. आपण इम्युनिटी बूस्टर डोस घेत सुटतो पण साधं कोवळ्या उन्हात बसून व्हिटॅमिन डी मिळावं म्हणून प्रयत्न करत नाहीत. खरंतर रोज सकाळी कोवळ्या उन्हात २० मिनिटं बसले तरी हा प्रश्न सुटू शकतो. पण लक्षात कोण घेतो?
(Image : Google)
कसे मिळणार व्हिटॅमिन डी?
१. आहारात दही, दूध, मश्रूम, संत्र्याचा ज्यूस,पालेभाज्या अवश्य घ्या. त्यानं हाडंही बळकट होतील. २. व्यायामाला पर्याय नाहीच त्यामुळे आहार आणि व्यायाम हे दोन्ही जमवलं तर व्हिटॅमिन डी शरीराला पुरेसं मिळेल. ३. रोज सकाळी कोवळ्या उन्हात २० मिनिटं बसा, चाला, चहा प्या. त्यातून त्वचेखाली हे जीवनसत्व तयार होते, त्यामुळे काहीच न करता नुसतं बसा.. तरी तब्येत उत्तम रहायला मदत होईल.