प्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने हे ख्यातनाम कार्डिओथोरॉसिस सर्जन आहेत. आपल्या यू ट्यूब चॅनलवर त्यांनी एका अत्यंत गंभीर पण दुर्लक्षित त्रासाबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. हा त्रास म्हणजेच ‘गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिजीज’ होय. यालाच आपण रोजच्या भाषेत अँसिडिटी होणं असं म्हटलं जातं. पण आपण जितक्या सहजपणे अँसिडिटी हा शब्द उच्चारतो तितका हा त्रास सहज नाही. या त्रासाकडे बहुतांशजण रोजचाच त्रास म्हणून डोळेझाक करतात. डॉ. नेने म्हणतात की हीच सवय अतिशय घातक आहे. गर्ड म्हणजे केवळ अँसिडीटी नाही. या त्रासाचं गांभीर्य समजण्यासाठी आधी तो समजून घेणं गरजेचं आहे.
डॉ. श्रीराम नेने ‘गर्ड’बद्दल सविस्तर सांगतात. ते म्हणतात की आपल्या शरीराच्या आत खूप काही प्रक्रिया घडत असतात. या प्रकियांमधे अनेक कारणांनी व्यत्यय येतो. त्याचा परिणाम म्हणून विविध त्रास आपल्याला जाणवतात. या त्रासापैकीच एक त्रास म्हणजेच अँसिडिटी, जळजळ. या लक्षणांच्या पोटात दडलेला आह तो गर्ड हा त्रास. डॉ. नेने सांगतात की, गर्डचा त्रास जेव्हा होतो तेव्हा पोटतील अँसिड मुख आणि पोट यांना जोडणार्या नलिकेत प्रवाहित होतं. या स्थितीलाच गर्ड असं म्ह्टलं जातं.
छायाचित्र- गुगल
गर्डची लक्षणं काय?
डॉ. श्रीराम नेने गर्ड या त्रासाकडे अजिबात कानाडोळा न करण्याचा सल्ला देतात. अनेक गंभीर आजारांचं कारण गर्डकडे केलेलं दुर्लक्ष ठरु शकतं. त्यामुळे त्याची लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं असतं.
* जेवणानंतर छातीत जळजळ होणं.
* तोंड कडवट पडणं.
* तोंडाची दुर्गंधी येणं.
* जीव मळमळणं, उल्टी होणं.
* काहीही गिळताना त्रास होणं
* घशात आगआग किंवा खवखव होणं.
डॉ. नेने आणि या आजाराचे अभ्यासक आणि तज्ज्ञ डॉक्टर्स म्हणतात की जर कोणालाही आठवड्यातून दोन वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस गर्डची लक्षणं दिसत असतील तर अजिबात वेळ न दवडता डॉक्टरांकडे जायला हवं. या लक्षणांकडे दुर्लक्ष झाल्यास अन्ननलिकेला गंभीर दुखापत होवू शकते. त्याचप्रमाणे दमा, कर्करोग यासारखे गंभीर आजारही शरीरात विकसित होवू शकतात. त्यामुळे वर म्हटल्याप्रमाणे आठवड्यातून दोन पेक्षा अधिक वेळा लक्षणं जाणवली की लगेच डॉक्टरांकडे जायला हवं.
2018 मध्ये ‘नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन स्टडी’ हा अभ्यास सांगतो की, गर्ड ही समस्या चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण होते. खरंतर ही खूप गंभीर समस्या आहे असं नाही. पण ती जाणवून सुध्दा त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर मात्र हा त्रास गंभीर स्वरुप धारण करतो. म्हणूनच गर्डवर तात्काळ उपाय करुन त्याला गंभीर होवू न देणे हेच उचित आहे.
छायाचित्र- गुगल
यावर उपाय काय?
गर्ड हा बहुतांशपणे जीवनशैलीशी निगडित असल्यानं डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितलेले उपायही जीवनशैलीशी निगडित आहे. हे उपाय समजून घेऊन आपल्या जीवनशैलीत आरोग्यदायी बदल करणं अजिबात अवघड नाही.
1. घट्ट कपडे घालू नये. विशेषत: पोट दाबलं जाईल असे कपडे घालणं, पॅण्टचा पट्टा किंवा सलवारची नाडी तेवढी घट्ट बांधणं टाळावं.
2. जेवण करताना मर्यादित स्वरुपातच आहार घ्यायला हवा.
3. आहारात तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.
4. जेवताना हळूहळू जेवावं आणि घास चांगला चावून खावा.
5. अल्कोहोलयुक्त पेयं, तंबाखू, चॉकलेटचं सेवन अधिक प्रमाणात करु नये.
6. जेवण झाल्यानंतर किमान अर्धा तास अजिबात झोपू नये.
छायाचित्र- गुगल
काय खावं-काय टाळावं?
* गर्डचा त्रास होवू नये किंवा तो होत असल्यास त्याची तीव्रता कमी होण्यासाठी तळलेले पदार्थ, फास्ट फूड, पिझ्झा, चिप्स, प्रोसेस्ड स्नॅक्स, तिखट, काळे पांढरे मिरे, चीझ, चरबीयुक्त मांस सेवन करणं टाळावं.
* टमाटायुक्त सॉस, आंबट फळं, चॉकलेट, पेपरमिण्ट, कबरेदकयुक्त मिठाया यांचं सेवन अतिशय कमी करावं किंवा टाळावं.
* गर्डच्या त्रासापसून वाचण्यासाठी न खाव्या लागणार्या पदार्थांची यादी खूप मोठी आहे असं नाही. तर खाता येणार्या पदार्थांची यादीही तितकीच मोठी आणि महत्त्वाची आहे. तज्ज्ञ सांगतात की फायबरयुक्त फूड खायला हवं. आहारात फायबरचं प्रमाण जास्त असल्यास जेवताना किंवा दिवसभरात जास्त खाल्लं जाणं सहज टाळता येतं. त्यासाठी गहू, ज्वारी, बाजरी, नागली, ओटमील, ब्राउन राइस, रताळी, बीट, गाजर यासरखी कंदमुळं, शतावरी, ब्रोकोली, हिरव्या शेंग भाज्या जास्त प्रमाणात खाव्यात.
* आम्लयुक्त पदार्थांनी पोटातील पीएच स्केल कमी होतो आणि पोटातील आम्ल अर्थात अँसिड हे उलट्या दिशेने उसळतं. म्हणूनच पोटातील पीएच स्केल वाढवणारे अल्कधर्मी पदार्थ खावेत. त्यात केळी, खरबूज, टरबूज, फ्लॉवर, बडिशेप, बदाम , अक्रोड यांचा समावेश होतो.
* भरपूर पाणी असलेले पदार्थ पोटातील अँसिडचा प्रभाव कमी करतात, ते खावेत. त्यात सेलरी, काकडी, लेट्यूस, कलिंगड, सूप आणि हर्बल टी यांचा समावेश होतो.