Join us   

How To Control BP: माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने सांगतात ब्लड प्रेशर कमी करण्याचे 4 उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 1:07 PM

How To Control BP? वारंवार बीपीचा त्रास होत असेल तर तो कंट्रोल करण्यासाठी काय करावं, याविषयी सांगत आहेत अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने. (Dr. Shriram Nene)

ठळक मुद्दे बीपीचा त्रास कंट्रोल करण्यासाठी धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे पती डाॅ. श्रीराम नेने सांगत आहेत ४ सोपे उपाय

सध्या प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्ट्रेसला सामोरे जावे लागतेय. शिक्षण, करिअर, नोकरी अशा प्रत्येक टप्प्यावर प्रचंड स्पर्धा वाढली आहे. या सगळ्याला रिलेशनशिपही अपवाद नाही. नात्यांमधला गुंता वाढतोच आहे. या सगळ्यांचा ताण येऊन लहान वयातच अनेकांना ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाबाचा (How To Control Blood Pressure?) त्रास जाणवतो. हा त्रास कमी करण्यासाठी धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे पती डाॅ. श्रीराम नेने सांगत आहेत ४ सोपे उपाय. (Madhuri Dixit's husband Dr. Shriram Nene)

 

बीपी वाढणे किंवा कमी होणे असा त्रास होत असेल तर साहजिकच डॉक्टरांच्या मदतीने गोळ्या औषधी घेणे गरजेचे आहेच. पण त्यासोबतच आपण घरातल्या घरात आपल्या व्यक्तिगत पातळीवरही बीपी कमी करण्यासाठी काही उपाय निश्चित करू शकतो. डॉक्टरांची औषधी आणि आपले एक्स्ट्रा एफर्ट्स नक्कीच तब्येत ठणठणीत ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच तर डॉ. नेने सांगत आहेत ते ४ उपाय करून बघायला हरकत नाही.

 

ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी .... १. निरोगी आहार (healthy diet) कोणताही आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. रक्तदाबाचा त्रास नियंत्रणात ठेवण्यासाठी मीठ जास्त असलेले पदार्थ खूप कमी खावेत. तसेच दूध, दही, केळी, टाेमॅटो, पालक, संत्री, अव्हॅकॅडो, जर्दाळू असे पाेटॅशियम जास्त असणारे पदार्थ भरपूर खावेत. दररोज कोणत्याही एका जेवणात २ लसूण पाकळ्या आणि आल्याचा लहानसा तुकडा कच्चा खाल्ल्यानेही ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

 

२. दररोज व्यायाम करा (regular exercise) ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या रोज शारिरीक हालचाली होणे गरजेचे आहे. त्यामुळे रोज ठराविक मिनिटांसाठी योगाभ्यास किंवा इतर काही वर्कआऊट करणे फायद्याचे ठरते. जीममध्ये वर्कआऊट करणार असाल तर ते खूप हेवी करू नका. योगासनं करणार असाल तर सेतूबंधासन, अधोमुख श्वानासन, विपरित करनी आसन, उत्तनासन हे बीपीचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

 

३. स्ट्रेस कमी करा (reduce stress) बीपीचा त्रास मागे लागण्यासाठी रोजच्या आयुष्यातील ताणतणाव हे सगळ्यात मुख्य कारण आहे. त्यामुळे स्ट्रेस कमी करण्यासाठी दररोज ठराविक वेळ प्राणायाम आणि ध्यानधारणा करणे फायद्याचे ठरते. दररोज थोडा व्यायाम, त्यानंतर प्राणायाम आणि नंतर मेडिटेशन किंवा शवासन असे वर्कआऊट रुटीन ठेवल्यास स्ट्रेस कमी होऊ शकतो. 

 

४. व्यसन नको.. रक्तदाबाचा त्रास होत असताना कोणतेही व्यसन करणे अतिशय हानिकारक आहे.. बीपीचा त्रास असतानाही स्मोकिंग, ड्रिंकींग अशी व्यसने केली तर हार्टअटॅक, पॅरालिसिस असे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे स्मोकिंग करणे, मद्यपान अशी व्यसने टाळा, असे डॉ. नेने यांनी सांगितले.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समाधुरी दिक्षितव्यायामआहार योजनायोगासने प्रकार व फायदे