आपल्या शरीराला पोषण मिळावे यासाठी विविध घटकांची आवश्यकता असते. मॅग्नेशियम हा त्यातीलच एक महत्त्वाचा घटक आहे. स्नायूंची ताकद वाढावी आणि मज्जातंतूंचे कार्य सुरळीत व्हावे यासाठी आपल्या शरीरात मॅग्नेशियमचे प्रमाणयोग्य असणे आवश्यकत असते. तसेच शरीरात डी व्हिटॅमिन चांगल्या प्रमाणात शोषले जावे यासाठीही मॅग्नेशियम गरजेचे असते. एकूण शरीरातील विविध कार्य सुरळीत होण्यासाठी मॅग्नेशियम हा अतिशय आवश्यक घटक आहे. आपण साधारणपणे शरीराला प्रोटीन, कॅल्शियम सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स मिळावेत यासाठी प्रयत्नशील असतो. पण मॅग्नेशियमसारख्या घटकाकडे आपले दुर्लक्ष होते. हे एक महत्त्वाचे खनिज असून ते पुरेशा प्रमाणात मिळाले नाही तर सामान्यपणे खालील लक्षणे दिसून येतात (Magnesium Deficiency Symptoms and Magnesium Rich Foods For Breakfast ).
१. थकवा आणि अशक्तपणा
२. भूक न लागणे - स्नायूंमध्ये पेटके येणे किंवा उबळ आल्यासारखे होणे
३. मळमळ किंवा उलटी
४. बधीरपणा
५. डोळ्यांच्या असामान्य हालचाली
६. हृदयाची असामान्य धडधड होणे
तुम्हालाही अशी लक्षणे दिसत असतील आणि शरीरातील मॅग्नेशियमची पातळी कमी झाली असेल तर आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. आहार हा पोषण मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा स्त्रोत असून हा आहार संतुलित असणे आवश्यक असते. यामध्ये ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असतो ते पाहायला हवे. मॅग्नेशियमची पातळी कमी असेल किंवा आपल्याला सतत थकवा येत असेल तर ब्रेकफास्टमध्ये आवर्जून घ्यायला हवेत अशा ५ पदार्थांची यादी...
१. ज्वारीची भाकरी
आपल्यापैकी अनेक जण रोजच्या जेवणात ज्वारीची भाकरी खातात. हीच गरमागरम भाकरी सकाळच्या नाश्त्यामध्ये खाल्ली तर फायदेशीर असते.
ज्वारीमध्ये मॅग्नेशियम आणि फायबर असल्याने आरोग्यासाठी ती फायदेशीर असते. तूप, लोणी, भाजी, आमटी अशा कशासोबतही ही भाकरी आपण खाऊ शकतो. महाराष्ट्रीय पारंपरिक पदार्थ मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत आहे असे म्हणायला हरकत नाही.
२. बदाम बटर टोस्ट
ब्रेडवर बदामाचं बटर लावून त्यावर तुमच्या आवडीप्रमाणे केळी, मध किंवा जॅम असे काहीही घालू शकता. हा ब्रेड स्लाईस तव्यावर चांगला भाजून घ्या. गरमागरम ब्रेड टोस्ट चवीला तर चांगले लागतातच पण आरोग्यासाठीही ते फायदेशीर असतात. ब्रेडच्या जागी आपण साधी पोळीही घेऊ शकतो.
३. बनाना ओटस पॅनकेक
बनवायला अगदी सोपे असलेले हे पॅनकेक विविध पोषक घटकांचा उत्तम स्त्रोत असतात. दूध, अंडे, ओटस पावडर, पिकलेले केळं, बेकींग पावडर, दालचिनी आणि थोडं मीठ हे सगळं एकत्र करुन चांगलं फेटून घ्या. नॉन स्टीक तव्याला तेल किंवा तूप लावून त्यावर हे पीठ घालून दोन्ही बाजुने चांगले भाजून घ्या. पॅनकेक तयार झाले की यावर मध घालून गरमागरम पॅनकेक खायला घ्या.
४. पालक डोसा
पालकांमध्ये लोह, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम हे सगळे घटक भरपूर प्रमाणात असतात. यासाठी पालक प्युरी करावी. उडीद डाळ आणि मेथ्या २ तास भिजवून मिक्सर करुन घ्यावे. यात गव्हाचे पीठ, मीठ, आलं-लसूण-मिरची पेस्ट एकत्र करुन डोसे घालावेत.
५. मूग सलाड
मोड आलेले मूड, कांगा, टोमॅटो. चवीसाठी शेव, मीठ, तिखट, चाट मसाला, कोथिंबीर सगळे एकत्र करुन हे सलाड खावे. मूग कच्चे नको असतील तर थोडे वाफवून घेतले तरी चालतात. तसेच मूगाला फोडणी देऊन थोडे मिसळीसारखे केले तरी चांगले लागते.