महाशिवरात्रीचा उपवास आपल्यापैकी अनेक जण आवर्जून करतात. भगवान शंकरावरची भक्ती म्हणून किंवा घरातल्या इतरांनी केला म्हणून हा उपवास घरोघरी केला जातो. काही जण तर उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी हा उपवास करतात. उपवास म्हटलं की आपण नेहमीचे पदार्थ न खाता उपवासाला चालतील असे साबुदाण्याची खिचडी, साबुदाणे वडे किंवा भगर-आमटी, उपवासाचे थालिपीठ, बटाटा असे पदार्थ खातो. तळकट आणि वातूळ पदार्थ खाल्ल्याने कधी आपल्याला पोट जड झाल्यासारखं वाटतं तर कधी अॅसिडीटी सतावते. उपवासाच्या दिवशी हे सगळे पदार्थ आवडीने खाताना आपल्या हे लक्षात येत नाही. पण नंतर मात्र आपल्याला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून उपवासाच्या दुसऱ्या दिवशी काय काळजी घ्यायची पाहूया (Mahashivratri Fasting Tips)...
१. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी शक्यतो चहा किंवा कॉफी टाळावी, कारण त्यामुळे अॅसिडीटी वाढण्याची शक्यता असते. त्याऐवजी ताक, गार दूध, शहाळं पाणी अशी पेय घ्यायला हवीत. उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने लिंबाचे किंवा कोकमचे सरबतही घेऊ शकतो. फळं शरीराला पौष्टीक असल्याने फळांचाही आहारात आवर्जून समावेश करायला हवा.
२. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी शक्यतो मसालेदार, तेलकट किंवा खूप जळजळीत पदार्थ खाऊ नका. त्याऐवजी दही भात, वरण भात, भाकरी असे हलके आणि सहज पचणारे पदार्थ खा. उपवासामुळे पोटाला एकप्रकारचा आराम मिळालेला असतो. अशात आपण पोटाला एकदम ताण दिल्यास त्यामुळे पचन बिघडू शकते.
३. कडक उपवास केला तर आपल्या अंगातील शक्ती कमी होण्याची शक्यता असते. अशावेळी ताकद येण्यासाठी उपवास सोडताना जेवणात रव्याची, तांदळाची, गव्हाची, दलियाची किंवा शेवयाची खीर खावी. कारण खीरीमधे प्रथिनं आणि कर्बोदकं असतात. या आहार घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. उपवास सोडताना खीर खाल्ल्यास उपवास सोडल्यानंतर अशक्तपणा वाटण्याची तक्रार दूर होते.