मायग्रेनची डोकेदुखी ही समस्या अनेकांना छळते. कोणाला महिन्या दोन महिन्यातून तर कोणाला आठवडा-पंधरवाड्यातून हा त्रास होतो. मायग्रेन का होतो, त्यावर उपाय काय यावर शास्त्रीय भाषेत बोलण्याऐवजी ही समस्या जणू न बरी होणारी, आयुष्यभर चिटकलेली असं म्हणून मायग्रेन सहन केला जातो. मायग्रेनचं एकच एक कारण नसल्यानं यावर जणू औषध नाही अशा समजूतीने डोकेदुखी थांबण्यासाठी केवळ पेन किलर्स घेण्यावर भर दिला जातो. अशा या मायग्रेनची चर्चा सध्या समाजमाध्यमावर होते आहे ती मीरा राजपूत हिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे. या पोस्टमधे मीरा आपल्याला होणार्या मायग्रेनच्या त्रासाबद्दल बोलली आहे. भर दुपारी उन्हात फिरल्यानं तिला असह्य डोकेदुखी सुरु झाली. शरीरातील पित्तदोष वाढल्यानं ही डोकेदुखी असेल असं तिला आधी वाटलं. पण पित्त शमनाचे उपाय करुनही तिच्या डोकेदुखीत किंचितही फरक पडला नाही. हा मायग्रेन असल्याचं तिला समजल. मायग्रेनच्या त्रासात डोक्यासोबतच तिचे डोळेही प्रचंड दुखत होते. यासाठी तिने घरातील काळे चणे तव्यावर भाजले. भाजलेले चणे एका कापडी पट्टीत गुंडाळून ही पट्टी तिनं डोळ्यावर ठेवली असता तिला बराच आराम मिळाल्याचं ती म्हणते. पण आपण करत असलेला हा उपाय नक्की शास्त्रीय आहे की आभासी याची मात्र तिला खात्री नाही. पण असं केल्यानं थोडातरी आराम मिळतो असा तिचा अनुभव आहे. आपल्या या पोस्टमधून मीरा आपण जे करतो ते बरोबर की चुकीचे असाही प्रश्न विचारते. तसेच तिने मायग्रेन आणि मोबाइल स्क्रीनचा ब्ल्यू लाइट याचाही संबंध जोडला आहे.
मीरा राजपूतच्या या पोस्टच्या निमित्ताने मायग्रेन म्हणजे नक्की काय? त्याचा आणि पित्ताचा खरंच काही संबंध असतो क? मीराने भाजलेल्या चण्यानं डोळे शेकणं हा खरंच या त्रासावरच योग्य उपाय आहे का? यावर नेमका उपाय काय? या सर्व प्रश्नांची चर्चा डॉ. राजश्री कुलकर्णी ( एम.डी आयुर्वेद, नाशिक) यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मायग्रेनबद्दलची माहिती विस्तारानं सांगितली.
Image: Google
मायग्रेनचा त्रास आहे काय?
डॉ. राजश्री कुलकर्णी सांगतात, मायग्रेन हा डोकेदुखीचा जो प्रकार आहे तो पित्त आणि वात या दोन्ही दोषांशी संबधित आहे. केवळ पित्तदोष वाढल्यानं जी डोकेदुखी होते ती वेगळी असते. यात डोकेदुखीसोबतच उलट्या होणं, मळमळणं, छातीत जळजळणं अशा प्रकारच्या तक्रारी असतात. असा त्रास हा प्रामुख्याने जागरण, उपाशी राहाणं यामुळे पित्त वाढतं आणि हा त्रास होतो. पण मायग्रेनची जी डोकेदुखी असते ती मात्र कोणताही मानसिक धक्का बसणं, मानसिकरित्या अस्वस्थ असणं, उन्हात फिरणं, प्रवास होणं, डोक्याला वारं लागणं या सगळ्या गोष्टींनी मायग्रेनचा त्रास होतो. कारण यात पित्त आणि वात हे दोन्ही दोष उफाळलेले असतात. त्यामुळे मायग्रेनची डोकेदुखी ही पित्ताच्या डोकेदुखीपेक्षा थोडी वेगळी असते. पण मायग्रेनमधे पित्तदोष असतोच. आपल्याला होणारा त्रास हा मायग्रेन आहे हे ओळखण्याचं मुख्य लक्षण म्हणजे तीव्र आणि असह्य डोकेदुखी असते. सकाळी जाग येते तीच डोके दुखीने. आणि जशी उन्हाची तीव्रता वाढेल तशी या त्रासाची तीव्रताही वाढत जाते. बहुतांश रुग्णांमधे संध्याकाळनंतर ही डोकेदुखी कमी होते. मायग्रेनच्या त्रासात मस्तक, डोकं, कपाळ यासोबतच गालाचा भाग, भुवयांच्या ठिकाणी वेदना होतात, प्रकाश सहन होत नाही, आवाज, कोलाहल, गोंगाट याचाही त्रास होतो. असे त्रास या मायग्रेनच्या समस्येत होतात.
बरेचदा काही रुग्णांना लक्षात येतं की आता डोकं दुखणार आहे ( याला वैद्यकीय भाषेत ऑरा असं म्हणतात).
मायग्रेनच्या त्रासात वारंवारिता असते. आठवडा, पंधरा दिवस, महिना-दोन महिने किंवा सहा महिने. अनेक रुग्णांना मायग्रेनचा त्रास सुरु झाला की त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी काही गोड खाल्लं की त्यांना थोडं बरं वाटतं. अनेकजण जिलबी किंवा पेढे खातात. यामुळे पित्ताचं शमन होवून डोकेदुखीचा त्रास कमी होतो.
Image: Google
मीरा राजपूतने मायग्रेन आणि मोबाइल स्क्रीनचा ब्ल्यू लाइट यांच्यातला जो संबंध सांगितला आहे तो बरोबर आहे. सध्या मोबाइलचा वापर काही मिनिटांवरुन अनेक तासंवर गेला आहे. त्यामुळे त्या ब्ल्यू लाइटचा परिणाम डोकेदुखी होण्यात होतो. मायग्रेनच्या रुग्णांसाठीच नाही तर इतर सर्वसामान्य लोकांसाठीही ब्ल्यू लाइटचा धोका आहेच. यामुळे डोळे खराबही होतात. तसेच ज्यांना आधीच मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी अती प्रमाणात मोबाइल पाहिला तर ब्ल्यू लाइटचा विपरित परिणाम होवून मायग्रेन डोकेदुखी, त्यातली वारंवरता वाढते.
मायग्रेनचा त्रास हा प्रामुख्याने तरुण वयात म्हणजेच 25 ते 45 च्या दरम्यान होतो. त्यानंतरच्या वयोगटात मायग्रेनचे रुग्ण जरा कमी असतात. 25 च्या आधीच्या वयोगटात पित्ताने होणारी डोकेदुखी किंवा डोळ्यांच्या चष्म्याशी निगडित डोकेदुखी होते. मायग्रेनचा त्रास हा गेल्या दहा पंधरा वर्षांपासून वाढलेला आहे. कारण काम करणार्या महिलांची संख्या वाढली आहे. कामाचा ताण, स्क्रीनचा वापर वाढला आहे. यामुळे मायग्रेनचा त्रास पूर्वीच्या तुलनेत आता वाढलेला आहे हे दिसून येतं.
Image: Google
मायग्रेनवर उपाय काय?
1. मायग्रेन हा त्रास बरा होत नाही असा समज आहे, तो चुकीचा आहे. मायग्रेनचं योग्य निदान झालं आणि त्यापद्धतीने त्याचे उपचार झाले तर डोकेदुखी पूर्णत: बरी होते. मायग्रेनवर उपाय करताना आयुर्वेदातील शुध्दीकर्म करणं आवश्यक आहे. वमन , विरेचन ज्यामुळे शरीरातील पित्ताचा त्रास कमी होतो आणि बस्ती यामुळे शरीरातील वातविकार शमतो. या दोन्ही शुध्दीक्रिया केल्यास मायग्रेनचा त्रास पूर्णपणे बरा होतो.
2, या त्रासात वेगवेगळे उपाय सांगितले आहेत. आयुर्वेदात यासाठी नस्य ( नाकातून औषध टाकणे) हा उपाय केला जातो. नस्य हा चांगला उपाय आहे. पण मायग्रेनचे जे रुग्ण असतात ज्यांना आधी समजतं की आता डोकं दुखायला लागणार आहे त्यांनी उपाशी असतील तर खावून खेणं, विश्रांती घेणं अशा प्रकारचे उपाय केले तर ही डोकेदुखी लवकर नियंत्रणात येते. शिवाय रुग्णांच्या कुटुंबियांनीही त्यांना या त्रासादरम्यान थोडी मदत करणे अपेक्षित असतं. म्हणजे रुग्णाचं जेव्हा डोकं दुखत असतं तेव्हा घरात शांतता राखणं, भांडणं होणार नाही, कलकलाट होणार नाही अशी काळजी घ्यायला हवी. मायग्रेनचे खूपसे रुग्ण असे असतात की रुममधील सर्व पडदे बंद करुन एक जरी झोप घेतली तरी त्यांची डोकेदुखी कमी होते. अशा प्रकारचा आराम रुग्णाला मिळायला हवा याची काळजी त्याच्या/ तिच्या कुटुंबानंही घेणं आवश्यक असतं.
3. अनेकजण मायग्रेनच्या डोकेदुखीवर डॉक्टरांकडे जाऊन उपचर घेण्याऐवजी डोकेदुखी थांबवण्यासाठी ओव्हर द काऊंटर मिळणारी पेन किलर्स सेवन करतात. हे खूपच धोकदायक आहे. मायग्रेनची डोकेदुखी शमवण्यासाठी वारंवार पेन किलर्स घेतल्याने शरीरातेल पित्त आणखी वाढतं. ज्यांना तीव्र डोकेदुखीचा त्रास वारंवार होत असेल तर त्यांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य राहिल. गोळ्या घेऊन डोकेदुखी केवळ दाबली जाते. ती बरी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाय करणं हाच खरा योग्य आणि सुरक्षित मार्ग आहे.
4. मायग्रेनच्या त्रासात रुग्णाला समुपदेशन घेण्याचाही सल्ला दिला जातो. कारण मानसिक तणावातूनही हा त्रास होतो. मायग्रेनचा संबंध मानसिक समस्येशी असेल तर ही मानसिक समस्या काय हे नेमकं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ही डोकेदुखी थांबत नाही.
5. मायग्रेन आणि मोबाइलचा ब्ल्यू लाइट याचाही संबंध असतो. त्यामुळे मोबाइल किंवा कम्पुटरला असं स्क्रीन लावावं ज्यामुळे त्यांचा ब्ल्यू इफेक्ट थेट डोळ्यांवर होणार नाही.
6. ज्यांचा स्क्रीनशी सतत संबंध आहे त्यांनी रात्री झोपताना कमीत कमी तीन ठिकाणी तरी तेल लावणं आवस्यक आहे असं आयुर्वेद सांगतं. शिरप्रदेश म्हणजे डोक्याला ( मध्यभागी मस्तकाला तेल लावून झोपावं,तळपायांना तेल लावावं. तळपायाचा आणि डोळ्यांचा थेट संबंध असतो. डोळे जळजळणं थांबतात, डोळ्यांवरील थकवा दूर होतो. आणि तिसरा भाग म्हणजे कानाच्या आत जो गोल भाग असतो तिथे थोड्याशा तेलानं मसाज केला तरी आराम मिळतो.
7. स्क्रीनवर काम करताना सतत स्क्रीनकडे न पाहाता थोड्या थोड्या वेळानं डोळ्यांची उघडझाप करणं, डोळ्यांना पुरेसा आराम देणं, स्क्रीनसमोर असतांनाही थोडा वेळ स्क्रीन बाजूला ठेवून डोळ्यांचे व्यायाम करणं, सुटीच्या दिवशी डोळ्यांवर बटाट्याचे/ किंवा काकडीचे काप ठेवावेत. यामुळे डोळ्याकडील उष्णता शोषली जाते. या घरगुती उपायांनी मायग्रेनचे रुग्ण डोळ्यांवरील ताण कमी करु शकतात.
Image: Google
असा उपाय घातकच!
मीरा राजपूतने आपल्या पोस्टमधे तव्यावर भाजलेल्या चण्याची पट्टी डोळ्यावर ठेवणं हा आयुर्वेदात चुकीचा उपाय समजला जातो. हदय आणि डोळे हे दोन अतिशय नाजूक अवयव आहेत. त्याठिकाणी थेट उष्णतेचा संबंध यायला नको. कोणत्याही वस्तू तापवून ते रुमालात गुंडाळून डोळ्यांना काही मिनिटं जरी शेक दिला तर तात्पुरतं वेदना शमवतं. पण त्या अवयवाचा सर्वांगिण विचार केला तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी असे उष्ण शेक हानीकारक असतात.
पण अशा प्रकारच शेक कपाळावर दिला तर चालतो. कपाळाची हाडं आहेत तिथे जर शेक दिला किंवा आपण पूर्वी करायचो तसं कंदीलावर कपडा ठेवून तो गरम करुन कपाळ शेकणं हे चालतं. असा शेक कपाळ, कानशिलांना चालतो. पण डोळे किंवा छाती सारख्या अवयवांवर थेट शेक दिल्याने मात्र तोटा होतो.
तज्ज्ञ मार्गदर्शन: डॉ. राजश्री कुलकर्णी ( एम.डी आयुर्वेद, नाशिकस्थित प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ )