Join us   

मायकल जॅक्सनच्या पत्नीचे कार्डिअ‍ॅक अरेस्टने निधन, हा आजार कशाने होतो? महिलांना किती धोका असतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 12:44 PM

Lisa Marie Presley dies at 54 after hospitalization दिवंगत पॉप गायक व डान्सर मायकल जॅक्सन यांच्या पूर्व पत्नीचे झाले निधन, कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे घेतला अखेरचा श्वास..

सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि गीतकार लिसा मेरी प्रेस्ली यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे लॉस एंजेलिस येथील निवासस्थानी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाले. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. लिसा मेरी प्रेस्ली या दिवंगत पॉप गायक व डान्सर मायकल जॅक्सन यांच्या पूर्व पत्नी होत्या. मेडिकल इमर्जन्सीमुळे लिसा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांची आई प्रिसिला प्रेस्ली यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना हृदयाच्या संबंधित समस्या उद्भवत आहे. अधिक करून कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे बहुतांश जणांचा मृत्यू होत आहे. याची संख्या भारतात देखील वाढत चालली आहे. मात्र, अनेकदा आपण हृदयविकाराचा झटका आणि कार्डिअ‍ॅक अरेस्ट या मधील फरक समजण्यास गल्लत करतो. कार्डिअ‍ॅक अरेस्टला म्हणजेच हृदयविकाराचा झटका असा सर्वसामान्य समज असला तरी हे दोन्ही प्रकार वेगळे आहेत.

यासंदर्भात इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील वरिष्ठ हृदयरोग विशेषज्ञ डॉ. अमित मित्तल सांगतात, ''कार्डिअ‍ॅक अरेस्ट म्हणजे हृदय पूर्णपणे काम करणं बंद करतं, तेव्हा त्याला कार्डिअ‍ॅक अरेस्ट असं म्हटलं जातं. हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका, ज्याला मायोकार्डियल इन्फ्रक्शन देखील म्हणतात, जेव्हा हृदयाच्या स्नायूच्या एका भागाला पुरेसे रक्त मिळत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते.

हृदयामध्ये सोडियम, कॅल्शियम, आणि पोटॅशियमचे चॅनेल्स असतात. या चॅनेल्समध्ये असंतुलन निर्माण झालं, तर हृदयाची धडधड अनियमित होते. त्याला वैद्यकीय भाषेत व्हीटीबीएस असं म्हटलं जातं. अशा स्थितीत संबंधित रुग्णाला वेळेत इलेक्ट्रिक शॉक दिला गेला नाही, तर त्याचा कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यू होतो''.

ब्रिटिश हार्ट फाउंडेशनुसार, हृदयातील इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये अडचणी उद्भवल्यानंतर शरीराच्या इतर भागांत रक्तपुरवठा होऊ शकत नाही. याच कारणामुळे कार्डिअ‍ॅक अरेस्टची समस्या उद्भवते. जेव्हा हृदय रक्ताचं पंपिंग बंद करतं, तेव्हा मेंदूतील ऑक्सिजनचं प्रमाणही घटतं. अशावेळी व्यक्ती बेशुद्ध पडते आणि श्वास घेता येत नाही. अशामुळे त्याचे प्राण देखील जाऊ शकते.

कार्डिअ‍ॅक अरेस्टची लक्षणे

श्वास घेता न येणे

नाडीचा ठोका न मिळणे

हृदय अचानक बंद पडणे

त्वचा फिकट आणि थंड पडणे 

टॅग्स : हृदयरोगहेल्थ टिप्स