Join us   

नवरात्र स्पेशल आरोग्य उपासना : थायरॉईड झाला, भयंकर टेन्शन आले? तज्ज्ञ सांगतात, थायरॉईडला घाबरण्यापेक्षा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 11:20 AM

Misconception about Thyroid Important Tips Regarding Medication : मधुमेह आणि ब्लड प्रेशर हे आजार खूप वर्ष असल्यास शरीरातील अवयवांवर परिणाम करतात तसे थायरॉईडचे नाही.

ठळक मुद्दे बऱ्याच वेळा रुग्ण वर्षानुवर्षे तपासणी न करता एकच डोस घेत रहातात, हे चुकीचे आहे. एखादी गोळी अगदी आयुष्यभर घ्यावी लागली पण त्याने तुमची तब्येत उत्तम राहणार असली तर काय हरकत आहे?

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

थायरॉईडचे आजार दोन प्रकारचे असतात. हायपोथायरॉईडीझम मध्ये थायरॉईड हॉर्मोनची कमतरता असते, त्यामुळे TSH या हॉर्मोन चे प्रमाण जास्त असते. या रुग्णांना थायरॉईड हॉर्मोन गोळीच्या स्वरूपात नियमित दिले जाते. दुसरा प्रकार हायपरथायरॉईडिझम म्हणजे थायरॉईड हॉर्मोनचे प्रमाण जास्त होते आणि TSH कमी होते. हा प्रकार जरा जास्त गुंतागुंतीचा असतो. बऱ्याच वेळा यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती शरीराविरुद्ध काम करत असते (autoimmunity). या समस्येसाठी  जास्त वेगवेगळ्या तपासण्या आणि उपचार लागू शकतात. या पेशंटनी एन्डोक्रिनोलॉजिस्ट म्हणजे हॉर्मोन्सच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते (Misconception about Thyroid Important Tips Regarding Medication). 

(Image : Google)

हायपोथायरॉईडिझमची समस्या म्हणजे थायरॉईडच्या ग्रंथीतून थायरॉईड हॉर्मोन्स तयार करण्याचे प्रमाण घटते. म्हणून आम्ही गोळ्या देऊन हे प्रमाण नॉर्मलला आणतो. थायरॉईड हॉर्मोन हा आपल्या शरीराच्या प्रत्येक कामासाठी अतिशय आवश्यक आहे. आपल्या अन्नाच्या पचनापासून ते मेंदूच्या कामापर्यंत, नखे, त्वचा यांचे आरोग्याचा या हॉर्मोनशी संबंध आहे. त्यामुळे याची कमतरता तुमच्या शरीराची खूपच हानी करू शकते. थायरॉईडची समस्या हा रोग नाही, ती फक्त एक कमतरता आहे. मधुमेह आणि ब्लड प्रेशर हे आजार खूप वर्ष असल्यास शरीरातील अवयवांवर परिणाम करतात तसे थायरॉईडचे नाही. फक्त एक गोळीने तुम्ही पूर्ण निरोगी राहू शकता मग ही गोळी न घेण्याचा एवढा दुराग्रह का??

एखादी गोळी अगदी आयुष्यभर घ्यावी लागली पण त्याने तुमची तब्येत उत्तम राहणार असली तर काय हरकत आहे? असा तर्कशुद्ध विचार रुग्ण का करत नाहीत हे कोडं आहे. प्रेग्नन्सी प्लॅन करणाऱ्या तरुणींसाठी तर थायरॉईड हॉर्मोनचे प्रमाण योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे नसेल तर प्रेग्नन्सी राहण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. प्रेग्नन्सी राहिली तरी गर्भपाताचा धोका वाढतो तसेच गरोदरपणात गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते. गर्भार स्त्रीमध्ये थायरॉईड हॉर्मोन्सची कमतरता असल्यास गर्भाच्या बौद्धिक क्षमतेवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो असे आढळून आले आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा प्रेग्नन्सीमध्ये फक्त बाळाच्या योग्य वाढीसाठी थायरॉईडच्या गोळीचा छोटा डोस सुरू केला जातो आणि डिलिव्हरी नंतर तो बंद केला जातो.

(Image : Google)

थायरॉईडच्या गोळ्या सुरू केल्यावर डोस ऍडजस्ट होईपर्यंत दर सहा आठवड्याला आणि एकदा डोस सेट झाला की निदान दर तीन महिन्याला TSH ची तपासणी करायला हवी. बऱ्याच वेळा रुग्ण वर्षानुवर्षे तपासणी न करता एकच डोस घेत रहातात, हे चुकीचे आहे. तसंच थायरॉईडची गोळी सकाळी उपाशीपोटी घेऊन अर्धा तास तरी दुसरे काहीही घेऊ नये. चहा सुद्धा अर्ध्या तासाने घ्यावा. गोळीचा योग्य परिणाम होण्यासाठी हे गरजेचे आहे. मनाने डोस वाढवणे आणि कमी करणे हे प्रकार टाळावेत. थायरॉईडच्या गोळ्यांची बाटली थंड आणि कोरड्या जागी ठेवावी. खिडकीत, उन्हात, ओल लागेल आशा ठिकाणी ठेवू नये.

आता एवढी माहिती घेतल्यावर मनातली थायरॉईडची भीती कमी झाली ना?तुमच्या आजूबाजूला असलेल्या निकटवर्तीयांनाही ही माहिती देऊन सगळ्यांच्या मनातला थायरॉईडचा बागुलबुवा काढून टाकूया...

(उद्या बोलू दुसऱ्या एका गैरसमजाविषयी)

(लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल