Join us   

भर पावसात शाळा सुरु होताना मुलांच्या डब्यात काय द्यायचं? मुलं आजारी पडू नयेत म्हणून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2024 5:50 PM

पावसाळ्यात मुलांचा आजार कसा ठेवायचा याविषयी खास सल्ला

ठळक मुद्दे मुलं आजारी पडतात. त्यांच्या काहीतरी बारीकसारीक तक्रारी चालूच राहतात आणि त्याचं कारण मात्र लक्षात येत नाही.

वैद्य राजश्री कुलकर्णी (M.D. आयुर्वेद)

पाऊस सुरु होणं आणि शाळा सुरू होणं हे अगदी हातात हात घालूनच येतात. नुकतीच शाळा सुरू होते आणि हळूहळू पाऊसही जोर धरू लागतो. कितीही काळजी घेतली, सांभाळलं तरी अचानक जोरात पाऊस येणं, भिजणं आणि मग किरकोळ तब्येतीच्या तक्रारी सुरु होणं हे शालेय विद्यार्थ्यांमध्ये, विशेषतः लहान वयाच्या मुलांमध्ये खूप कॉमन आहे. त्यात मुलांच्या खाण्याच्या बदलत्या सवयी अजून भर घालतात. काही शाळांमध्ये दोन तर काही शाळांमध्ये तीन टिफीन द्यावे लागतात. मग घरात असणाऱ्या गोष्टी, हातात असणारा वेळ आणि मुलांची आवड लक्षात घेऊन प्रत्येक आई हे टिफीन तिच्या पद्धतीने मॅनेज करत असते. एक डबा मोठ्या सुट्टीत खायचा हा बहुतांशी भाजीपोळी असाच देणं अपेक्षित असतं,. ज्या शाळा दुपारचं जेवण देतात त्याही भाजीपोळी, वरण भात असं देण्याचा प्रयत्न करतात.

इतकं करुनही मुलं आजारी पडतात. त्यांच्या काहीतरी बारीकसारीक तक्रारी चालूच राहतात आणि त्याचं कारण मात्र लक्षात येत नाही. ते खरं कारण असतं बदलत्या ऋतूत. हवामानात. पाण्यात. आहारात. ते समजून त्यात बदल केले की हे सगळं टाळता येतं.

नक्की होतं काय ? खूप उष्ण असणारं हवामान तीन चार दिवस सलग पाऊस पडला की एकदम गार होऊन जातं. पहिले काही दिवस जमिनीतून उष्ण वाफा निघत असतात, धूळ धुतली जात असते. पाणी एकदम गढूळ होऊन जातं,  हे पाणी पचायला जड असतं आणि शरीरात अम्लता निर्माण करणारं असतं त्यामुळे पोटाचे आजार, पचनाच्या तक्रारी, ॲसिडिटी असे त्रास उद्भवतात. लहान मुलांमध्ये असं पाणी चुकून जरी पिण्यात आलं तरी पाण्यातून पसरणारे आजार पट्कन होण्याची शक्यता असते. जुलाब होणे, उलट्या होणे, पोट दुखणे, गॅसेस, टायफॉइड असे विविध आजार या दूषित पाण्यामुळे होऊ शकतात. पचन शक्ती मंदावलेली असताना खाण्यात काही जड पदार्थ आले तर शरीर ते पचवू शकत नाही आणि पोट गुबारणे,काहीच खाण्याची इच्छा न होणे हेही या दिवसांत पहायला मिळते. पावसात भिजून अंगावर ओले कपडे दीर्घकाळ राहिले तर तो थंडावा बाधतो आणि सर्दी खोकला ताप या आजारांना निमंत्रण देतो.

अशावेळी करायचं काय तर, ज्या ज्या वेळी शक्य आहे त्या वेळी मुलांना गरमच खायला द्या, लहान मुलांच्या शाळा थोड्या उशीरा असतात व लवकर सुटतात. त्यांना घरुन काहीतरी गरम व पौष्टिक खाऊ घालून पाठवणे आणि पुन्हा घरी आल्यावर गरम खाऊ घालणं हा उत्तम उपाय आहे पण हा प्रॅक्टिकली दर वेळी शक्य होईलच असं नाही पण जेव्हा शक्य होईल तेव्हा तसा प्रयत्न नक्की करावा. हवेत गारवा आल्यावर लहान मुलांना सर्दी खोकला वारंवार होतो आणि एका मुलाकडून दुसऱ्याला असं सारखं याची लागण होत राहते त्यामुळे गार पदार्थ, आंबट पदार्थ अजिबात देऊ नयेत.

आहाराची अधिक काळजी घ्यायला हवी, पण म्हणजे नेमकं काय करायचं हे आपण पुढच्या लेखात पाहू..

www.ayushree .com आयु:श्री आयुर्वेदीय हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, इंदिरा नगर, नाशिक  संपर्क: 94047 66620

टॅग्स : Shalechi Taiyariमानसून स्पेशलमोसमी पाऊसलहान मुलंशाळा