Join us   

पावसाळ्यात सतत मुलं आजारी पडतात, पोट बिघडतं-जुलाब होतात? हा त्रास टाळण्यासाठी काय करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2024 2:23 PM

साथीच्या आजारांचा लहान मुलांना होणारा संसर्ग कसा टाळायचा?

ठळक मुद्दे लहान मुलांची नखे वेळेवर काढा. स्वयंपाक करण्यापूर्वी भाज्या, कडधान्य, डाळी तसेच खाण्यापूर्वी फळे स्वच्छ धुवून घ्या.

डाॅ. संजय जानवळे (बालरोगतज्ज्ञ) राज्यात गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, काॅलरा, टायफाॅइड अशा जलजन्य आजाराच्या रुग्णामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. सन २०२३ मध्ये राज्यभरात दूषित पाण्यामुळे झालेल्या आजारांची १९ वेळा साथ आली. परंतु यंदा १ जानेवारी ते १४ जुलै २०२४ दरम्यान २६ साथींची नोंद झाली. पावसाच्या नव्या पाण्याबरोबरच साथीच्या रोगांचे थैमान माजते. त्यामुळे हे जलजन्य आजार टाळण्यासाठी काळजी घ्यायला हवी.

पावसाळयात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असते. थंडीचे प्रमाण सतत कमी-जास्त होत असते. त्याचा परिणाम आपल्या शरीरातील क्रियांवरही होत असतो. आपली पचनशक्ती तसेच रोगप्रतिकारशक्ती मंदावते. पावसाळ्यात अशुद्ध पाण्याबरोबर दूषित अन्नाचं प्रमाणही वाढलेलं असतं. विशेषत लहान मुलांत अशा सूक्ष्मजंतूमुळे होणाऱ्या संसर्गजन्यआजाराविरुद्ध लढणारी प्रतिकारशक्ती अविकसित असते. मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलं संसर्गजन्य रोगांना अधिक बळी पडतात.

पावसाळा हा पाणीसुद्धा 'फुंकून' पिण्याचा मोसम. अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी (डिहायड्रेशन) होते व कुषोपण होते. पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचं अतिसार हे क्रमांक एकचे मृत्यूचे कारण असते. अस्वच्छ परिसर, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि स्तनपानापेक्षा बाटलीने पाजण्याकडे असलेला कल ही अतिसाराचा प्रादुर्भाव होण्याची मुख्य कारणे आहेत. दूषित पाण्यातून पोटात जंतू जातात. हे पाणी वरकरणी स्वच्छ दिसत असले तरी त्यात डोळ्यांना न दिसणाऱ्या अतिसूक्ष्मजंतूमुळे दूषित झालेले असते.

हे करा.. १. पिण्याचे पाणी दूषित नसावे, यासाठी दक्षता घ्या. पाणी गाळून व उकळून घ्या. पाणी निर्जंतूक करण्यासाठी ते उकळून (२० मिनिटे) घेणे आवश्यक आहे. पाणी फिल्टर असल्याच उत्तम! २. परिसर स्वच्छ ठेवा. मुलांच्या हातांची नियमित स्वच्छता राखल्यास हिपॅटायटिस ‘ए’, विषमज्वर, अतिसार इत्यादी आजारांपासून त्यांचा बचाव करता येतो.

३. लहान मुलांची नखे वेळेवर काढा. स्वयंपाक करण्यापूर्वी भाज्या, कडधान्य, डाळी तसेच खाण्यापूर्वी फळे स्वच्छ धुवून घ्या. शिजवलेले अन्नपदार्थ लगेच खा. थंड झालेले अन्नपदार्थ खाण्यापूर्वी पुन्हा गरम करून घ्या. ४. भांडी पुसण्याचा कपडा रोज बदला व तो उकळून घेतलेल्या पाण्यानी धुवा. ५. जनावरांची लघवी ज्याठिकाणी असेल अशा दूषित झालेल्या चिखलात अथवा साठून राहिलेल्या पाण्यात मुलांना अनवाणी पायाने खेळू देऊ नका.

dr.sanjayjanwale@icloud.com

टॅग्स : आरोग्यलहान मुलं