Join us   

पावसाळ्यात फळं खावीत की नाही? खायचीच तर लक्षात ठेवा ३ गोष्टी, तब्येत राहील चांगली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2023 11:07 AM

Monsoon Diet Tips about Eating Fruits : खायचीच असतील तर कोणती आणि कोणत्या वेळेला खायची याबाबत

फळं आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात म्हणून सर्व रंगांची, चवीची फळं नियमितपणे आवर्जून खायला हवीत असं सांगितलं जातं. रोजच्या आहारात किमान १ तरी फळ असायलाच हवं असं आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरही सांगतात. फळांमध्ये असणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने त्यांचा आहारात समावेश करायला हवा. विशिष्ट सिझनमध्ये बाजारात येणारी आणि स्थानिक ठिकाणी पिकणारी फळं तर आवर्जून खायला हवीत. हे जरी खरे असले तरी पावसाळ्यात ज्याप्रमाणे जड अन्न, पालेभाज्या, मांसाहार यांसारख्या गोष्टी वर्ज्य कराव्या असे सांगतात त्याचप्रमाणे पावसाळ्यात फळं खातानाही योग्य ती काळजी घ्यायला हवी. फळं पचायला जड असतात त्यामुळे पावसाच्या काळात फळ खाणं कितपत योग्य आहे आणि खायचीच असतील तर कोणती आणि कोणत्या वेळेला खायची याबाबत समजून घेऊया (Monsoon Diet Tips about Eating Fruits)...

(Image : Google)

१. पचायला जड

फळं पचायला हलकी असतात असा आपला समज असतो. मात्र ती पचायला जड असतात. पावसाळ्यात अग्नी मंद होत असल्याने फळं खाल्ली तरी ती लवकर पचत नाहीत. ही फळं पचण्यासाठी शरीराला खूप त्रास पडतो आणि त्याचा पोटावर ताण येतो. त्यामुळे शक्यतो फळं खाणं टाळलेलं केव्हाही चांगलं.

२. कधी खावीत? 

अनेकांना नाश्ता झाल्यावर किंवा जेवण झाल्यावर फळ खायची सवय असते. हॉटेलमध्ये किंवा समारंभातही जेवणानंतर फ्रूट डीश दिली जाते. मात्र तसे करणे योग्य नाही. फळं ही पूर्णत: कच्ची असतात. आपण जे अन्न खातो त्यावर प्रक्रिया केलेली असते म्हणजेच ते शिजवलेले असते. शिजवलेल्या अन्नावर कच्चे फळ खाल्ल्यास पचनशक्तीवर ताण येतो आणि हे दोन्हीही योग्यरित्या पचत नाही. म्हणून फळ साधारणपणे ११ वाजता, दुपारी ४ वाजता खावे. संध्याकाळी ६ नंतर शक्यतो कोणतीही फळे खाऊ नये.

(Image : Google)

३.  कोणती फळं खावीत कोणती खाऊ नये? 

पावसाळ्यात आपल्याला सर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशावेळी केळी, पेरु, सिताफळ यांसारखी फळे शक्यतो खाऊ नयेत. पपई, डाळींब, सफरचंद, पेर यांसारखी फळं खाल्ली तरी हरकत नाही. मात्र ही फळं स्वच्छ धुवून खायला हवीत. तसेच खोकला नसेल तर संत्री-मोसंबी ही फळंही खाऊ शकतो. तसंच बाजारात फळं खरेदी करताना ती वरुन अतिशय चांगली मात्र आतून खराब असू शकतात. त्यामुळे फळं खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफळेमोसमी पाऊसपावसाळा आणि पावसाळी आजारपण