Join us   

रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून रोज जा-ये करता? पायाला इन्फेक्शनचा धोका, 4 उपाय-काळजी घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 5:38 PM

Monsoon Foot Care Tips: पावसाळ्यात पायांची योग्य ती काळजी कशी घ्यायची ते पाहूया

पाऊस एकदा पडायला लागला की थांबायचे नाव घेत नाही. पावसात चिकचिक असल्याने आपल्याला अजिबात बाहेर पडावेसे वाटत नाही. मात्र ऑफीस, इतर कामे यांसाठी बाहेर पडावेच लागते. आपण रेनकोट, छत्री, जॅकेट, टोपी अशा सगळ्या गोष्टी घालून शरीराची ओलं होण्यापासून काळजी घेत असलो तरी पावसामुळे पाय मात्र खराब होतातच. कितीही चांगल्या चपला किंवा बूट घातले तरी पायांना पाणी आणि चिखल लागतोच. (Monsoon Foot Care Tips) आपल्याला यामुळे नकोसे होत असले तरी त्याला काहीच पर्याय नसतो. तसेच काहीवेळा चालत जाण्याशिवायही पर्याय नसल्याने हे पाय खराब होणे ओघानेच आले. (Infections) पाय गार राहिल्याने, ओले राहिल्याने तसेच पायांना चिखल लागल्याने आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात पायांची योग्य ती काळजी कशी घ्यायची ते पाहूया (How to Take Care Of your Foot in Monsoon).

(Image : Google)

१. चपला किंवा बूट 

पावसाळ्यात शक्यतो चपला वापरु नयेत. यामुळे जास्त प्रमाणात पाय उघडे राहतात आणि त्यांना जास्त पाणी लागण्याची शक्यता असते. पाण्यामुळ गारठा तर होतोच पण रस्त्यावर पाण्यात असलेली घाणही पायांना लागते. त्यामुळे बूट वापरणे सर्वात चांगले. मात्र हे बूट घेत असताना त्यात पाणी साचून राहत नाही ना, पुर्णपणे बाहेर पडते ना, बूट चावत नाहीत ना या सगळ्याची शहानिशा करुन मगच चप्पल किंवा बूट खरेदी करायला हवेत. 

पावसाळ्यात मुलं वारंवार आजारी पडतात, आलं-तुळशीचा चमचाभर रस ठरतो गुणकारी, पाहा कसा घ्यायचा?

२. दिर्घकाळ पाय पाण्यात राहिल्यास 

काही वेळा आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो तर कधी चालताना बराच वेळ आपले पाय पाण्यात राहतात. अशावेळी पाय गारठण्याची शक्यता असते. तसेच पायांना पाण्यामुळे एकप्रकारच्या सुरकुत्याही पडतात. अशावेळी घरी आल्यावर पाय कोमट पाण्याने धुणे, शक्य तितक्या लवकर कोरडे करणे, त्यांना मॉईश्चरायजर लावणे आणि शक्य असल्यास पायात सॉक्स किंवा स्लिपर घालणे. यामुळे पायांचा गारठा कमी होतो. पाय जास्त गार पडल्यास सर्दी-पडसे होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे जास्त वेळ पाय पाण्यात राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

३. चिखल्या 

अनेकदा पाय जास्त काळ पाण्यात राहिले किंवा व्यवस्थित कोरडे केले गेले नाहीत तर बोटांच्या मध्यभागी चिखल्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्यातून आल्यावर पाय स्वच्छ कोरडे करणे आवश्यक असते. या चिखल्या एकदा झाल्या की त्या लवकर बरे व्हायचे नाव घेत नाहीत. त्यामुळे खाज येणे, जखमा होणे, आग होणे अशा समस्या निर्माण होतात. म्हणून शक्यतो पायाच्या बोटांमधील जागा कोरडी करणे आवश्यक असते. 

(Image : Google)

४. त्वचेचे इन्फेक्शन

सतत पाऊस असल्याने अनेकदा रस्त्यात पाणी साचते. अनेकदा आपल्याला या साचलेल्या पाण्यातून जा-ये करावी लागते. या पाण्यात काही किटक असण्याची शक्यता असते. तसेच पाण्यातील घाणीमुळेही आपल्याला त्वचेचे आजार उद्भवू शकतात. याशिवाय दिर्घकाळी अंगावरील कपडे ओले राहीले तर ताप-सर्दी होतेच पण पायाची त्वचा पांढरी पडणे, त्वचा सोलवटल्यासारखी होणे, जखमा होणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे शक्यतो जास्त वेळ पावसाच्या पाण्यात पाय ठेवणे टाळावे.    

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समानसून स्पेशलत्वचेची काळजी