उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही झालेली असल्याने आपण आवर्जून पावसाळ्याची वाट पाहत असतो. पावसाळा म्हणजे सगळीकडे हिरवेगार, निसर्गाचे एकदम आगळे रुप, फिरायला जावे असेच वातावरण. पण या काळात सर्वाधिक आजार डोकं वर काढतात. सततच्या दमट हवामानामुळे हवेत वाढणारे जंतूंचे प्रमाण, पाणी दूषित होत असल्याने आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. मात्र पावसाळा एन्जॉय करता यावा आणि आजारपण आपल्यापासून दूर राहावे यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी आहार-विहार योग्य असणे गरजेचे असते. पचनक्रियेशी निगडीत तक्रारी, ताप-सर्दी, त्वचेच्या समस्या, सांधेदुखी उद्भवू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याविषयी (Monsoon Health Care Tips Lifestyle)...
१. सांधेदुखी
या काळात हवेत एकप्रकारचा दमटपणा असल्याने सांधेदुखीच्या समस्या वाढतात. अशावेळी हलका व्यायाम करावा. यामध्ये स्ट्रेचिंग, चालणे, सूर्यनमस्कार या गोष्टींचा समावेश असू शकतो. तसेच तेलाने हलका मसाज घ्यावा, त्याचा निश्चित फायदा होतो.
२. पोटाचे विकार
पावसामुळे पाणी गढूळ होते आणि या पाण्यातून विविध आजार पसरतात. अतिसार, उलट्या, जुलाब यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात. यामुळे पावसाळ्यात पाणी उकळून प्यायला हवे. तसेच बाहरचे पदार्थ खाणे पावसाळ्यात आवर्जून टाळायला हवे.
३. ताप-सर्दी
पावसाळ्यात हवेत बदल होत असल्याने ताप आणि सर्दीच्या रुग्णांची संख्या वाढते. तसेच एकमेकांच्या वासाने हा त्रास मोठ्या प्रमाणात पसरतो. अशावेळी शक्यतो गरम कपडे घालणे, जास्तीत जास्त आराम करणे, भरपूर पाणी पिणे आणि ताजे व गरम अन्न खाणे या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जास्तच त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करायला हवेत.
४. त्वचेच्या समस्या
पावसाळ्यात त्वचेचे इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते. घामाने किंवा पाण्याने ओले राहिल्याने त्वचेला खाज येणे, पुरळ येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी सुती कपडे वापरणे, जास्तीत जास्त स्वच्छता ठेवणे, अंग वेळच्या वेळी कोरडे करणे, भरपूर पाणी पिणे या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
५. प्रतिकारशक्ती
पावसाळ्यात प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम, उत्तम आहार, झोप या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. नाहीतर विविध प्रकारणे विषाणू आपल्यावर हल्ला करतात. आपली प्रतिकारशक्ती चांगली नसेल तर आपण सतत आजारी पडतो. यासाठी परीपूर्ण आहार घेणे अतिशय आवश्यक असते.