डाॅ. संजय जानवळे (बालरोगतज्ज्ञ)
पावसाळा हा सर्वांना हवाहवासा वाटणारा एक देखणा ऋतू ! मान्सूनचे आगमन आनंददायी असते. मान्सूनच्या आगमनाने वातावरणात दरवळणारा मृदगंध मन सुखावणारा असतो. सर्वत्र हिरवळ दाटलेली असते. रंगीबेरंगी फुललेल्या फुलांचा टवटवीतपणा नयनरम्य असतो. हवेत गारवा असतो. पावसाळ्यात निसर्ग अत्यंत देखणा असतो. शांत, आशादायक व विलक्षण आनंद देणारा हा काळ असतो. पण तो आरोग्यासाठी मात्र तितकासा चांगला नसतो कारण या काळात पचनशक्ती मंदावलेली असते, प्रतिकारशक्ती खालावलेली असते. म्हणून पावसाळ्यात पचनसंस्थेचे आजार, अतिसार, सर्दी-खोकला, डेंग्यूताप, मलेरिया यासारख्या संसर्गरोगांचे प्रमाण वाढलेले असते. त्वचेवर पुरळ येते. याचकाळात मुलं आजारी पडतात. योग्य आहार-विहार करुन मान्सूनमध्ये आपण शारीरिक फिटनेस राखल्यास व आरोग्याची काही पथ्ये पाळल्यास या आजारांपासून सहज बचाव करणे शक्य आहे. तेव्हा काळजी कशी घ्यायची?
आहार कसा हवा?
१. मोसमी फळं खा. पावसाळयात जांभळं, पिअर, डाळिंब, पपई, लिची, सफरचंद अशी फळं सहज उपलब्ध होतात. ही फळं खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, फ्ल्यू अशा आजारांपासून आपला बचाव होतो. फायबर जास्त असल्याने बद्धकोष्ठ होत नाही. ही फळं स्मृतिवर्धक असतात, मेंदू तल्लख राहतो.
२. पावसाळयात सूप प्या. सूप पचायला हलके असते व ते पिण्याने शरीरातील पाण्याचा पातळी राखली जाते.
३. आहारात कडधान्यांचा समावेश करा. तूर किंवा मुगदाळीच्या वरणात प्रथिने मुबलक असतात.
४. दही व आबंविलेले पदार्थ. दही खाल्याने आतड्यातील उपयुक्त जंतूचा समतोल राखला जातो.
५. हर्बल चहा-तुलसी, आलेयुक्त चहा पिणे उत्तम. त्यात साखरेऐवजी मध घाला. मध जिवाणूरोधक असतो. हळदी दूध-रात्री झोपण्यापूर्वी प्या.
लसूण- आहारात लसणाचा समावेश करा त्यामुळे दाह कमी होतो. लसूण घालून केलेली खोबऱ्याची चटणी खावी.
६. साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, दुधी भोपळा, तोंडली, पडवळासारख्या भाज्या तसेच गोड ताक, सुंठीची कढी असे अन्न पावसाळ्यात खावे.
७. पावसाळयात शक्यतो नवीन धान्याचा समावेश करु नका. जुने व साठवून ठेवलेले धान्य पचण्यास हलके असते. तांदूळ शिजवण्यापुर्वी भाजावेत.
dr.sanjayjanwale@gmail.com