Join us   

Morning Routine : झोपेतून उठल्य़ावर रिकाम्या पोटी खा २ गोष्टी, ताकद वाढण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 4:00 PM

Morning Routine : या दोन्ही गोष्टी पाण्यात भिजवल्य़ाने त्यांतील पोषक तत्वांची वाढ होते आणि दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीराला प्रथिनांबरोबरच लोह, कॅल्शियम मिळण्यास मदत होते.

ठळक मुद्दे हरभरा डाळीतील मॅग्नेशियम शुगर असणाऱ्या व्यक्तींसाठी फायदेशीर असते. हाडांची घनता कमी होऊ नये म्हणून नियमितपणे अशाप्रकारे भिजवलेले बदाम आणि हरभरा खाणे फायद्याचे ठरते. 

सकाळी उठल्या उठल्या आपल्यातील अनेक जण चहा किंवा कॉफी घेतात. जे काहीच घेत नाहीत ते थेट ब्रेकफास्ट करतात. पण शरीराची ताकद वाढवायची असेल आणि तब्येतीच्या तक्रारींपासून दूर राहायचे असेल तर आपले मॉर्निंग रुटीन (Morning Routine) कसे असले पाहीजे याबाबत आपल्याला माहिती असायला हवी. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेणे आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगले नसते. याऐवजी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या रात्रभर भिजत घातलेले बदाम आणि हरभरा (Soaked Badam and black Gram) खाल्ल्यास शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. दिवसभर घरातील, बाहेरची आणि ऑफीसची कामे करण्यासाठी आपली बरीच ऊर्जा खर्च होत असते. अशावेळी आपला आहार आणि विहार चांगला असेल तर आपली ताकद टिकून राहण्यास मदत होते. नाहीतर आपल्याला खूप थकवा येतो किंवा आरोग्याच्या काही ना काही तक्रारी उद्भवतात. 

बदामात फायबर आणि फॅटस भरपूर प्रमाणात असतात. तसेच हरभऱ्यांमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते. तसेच या दोन्हीमध्ये प्रथिनांचे प्रमाणही चांगले असते. त्यामुळे या दोन्ही पदार्थांमधून शरीरासाठी आवश्यक असणारे बहुतांश घटक मिळतात आणि शरीराची ताकद वाढण्यास मदत होते. इतकेच नाही तर कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी, हृदयाचे कार्य सुरळीत राहण्यासाठी, हाडे मजबूत राहण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम आणि हरभरे खाण फायददेशीर ठरते. या दोन्ही गोष्टी पाण्यात भिजवल्य़ाने त्यांतील पोषक तत्वांची वाढ होते आणि दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीराला प्रथिनांबरोबरच लोह, कॅल्शियम मिळण्यास मदत होते. 

(Image : Google)

१. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त 

भिजवलेले बदाम आणि हरभरे यांच्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते आणि पोषक तत्त्वांचे प्रमाण जास्त असते. या दोन्ही गोष्टी प्रोटीन आणि फायबर यांचा उत्तम स्रोत असल्याने शरीरास फायदेशीर असतात. तसेच बदाम आणि हरभरे यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने आरोग्यासाठी उपयुक्त असते. फायबर जास्त असल्याने जास्त खाण्यापासून रोखण्यासाठी या गोष्टी खाण्याची मदत होते, त्यामुळे नकळत वजनावर नियंत्रण येते. 

२. हृदय चांगले ठेवण्यास उपयुक्त 

बदामात असलेले फ्लेवोनाईडस आणि फॅटी अॅसिड्स यांमुळे हृदयाचे कार्य चांगले होण्यास मदत होते. तसेच फ्लेवोनाईड या घटकामुळे सूज कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर यातील व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटकांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

३. हाडे मजबूत राहण्यास होते मदत 

हाडे मजबूत राहण्यासाठी शरीराला कॅल्शियमची आवश्यकता असते. बदाम आणि हरभरा या दोन्हीमध्ये कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत होते. जसे वय वाढते तशी आपल्या हाडांची घनता कमी होत जाते आणि हाडे ठिसूळ होतात. यालाच वैद्यकीय भाषेत ऑस्टीओपोरॅसिस असे म्हणतात. हाडांची घनता कमी होऊ नये म्हणून नियमितपणे अशाप्रकारे भिजवलेले बदाम आणि हरभरा खाणे फायद्याचे ठरते. 

(Image : Google)

४. रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी फायदेशीर

सध्या डायबिटीस असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या व्यक्तींच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. शरीरातील इन्शुलिनच्या कार्यात सुधारणा करण्यास हे दोन्ही पदार्थ फायदेशीर असतात. तसेच यामध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण कमी असल्याने डायबिटीससाठी हे दोन्ही घटक चालू शकतात. हरभरा डाळीतील मॅग्नेशियम शुगर असणाऱ्या व्यक्तींसाठी फायदेशीर असते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल