निरोगी आयुष्य जगण्यासाठी शरीराला व्यायामाची सवय असावी. व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे शरीराची ताकद वाढते, वजन कमी होते, मेटॅबॉलिझम रेट वाढते, बिपी शुगर कंट्रोलमध्ये राहते, अशा वेगवेगळ्या उदिष्टांसाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. मात्र, या धकाधकीच्या जीवनात व्यायामाला वेळ देणं काहींना जमत नाही. त्यामुळे अनेक लोकं मिळेल त्या वेळेनुसार व्यायाम करतात. काही लोकांना दिवसाच्या सुरुवातीला व्यायाम करून फ्रेश वाटते. तर, काहींना संध्याकाळी व्यायाम करून उत्साहित वाटते. प्रत्येकाची व्यायाम करण्याची शैली वेगळी आहे.
यासंदर्भात स्वीडनमधल्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूमध्ये फिजिओलॉजी विषयाचे प्राध्यपक डॉ ज्युलिन झेराथ म्हणतात, "दिवसातल्या वेगवेगळ्या वेळांमध्ये केलेल्या व्यायामाचे विविध फायदे आहेत. दिवसाच्या कोणत्या वेळेला आपण व्यायाम करतोय यावरून आपला मेटाबॉलिझम कसा काम करेल हे ठरतं. दिवसात काही ठरविक वेळा असतात जेव्हा विशिष्ट संप्रेरकं स्रवतात. तर काही संशोधनात असे दिसून आले आहे की, काही लोकांमध्ये सकाळी केलेल्या व्यायामुळे चरबी जलदगतीने बर्न होते.''
सकाळी केलेला व्यायाम उत्तम
प्रोफेसर ज्युलिन झेराथ पुढे म्हणतात, ''सकाळी केलेल्या व्यायामुळे शरीरातील मेटाबॉलिझम रेट वाढतो, यासह अतिरिक्त चरबी कमी करण्यासही मदत होते. परंतु, सकाळच्या व्यायामाच्या तुलनेत सायंकाळी केलेल्या व्यायामाचा प्रभाव शरीरात एवढा दिसून येणार नाही. जर आपण वजन कमी करत असाल तर, सकाळचा व्यायाम आपल्यासाठी उत्तम ठरू शकेल.''
उंदरांवर झाला प्रयोग
शास्त्रज्ञांनी उंदरांना दिवसातून दोनवेळा उच्च-तीव्रतेच्या वर्कआउट्सवर सेट केले. त्यांच्या ऍडिपोज टिश्यूवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान, त्यांनी ऍडिपोज टिश्यूमध्ये कोणती जनुके सक्रिय आहेत याचे निरीक्षण केले. यावरून शास्त्रज्ञांना असे आढळले की, चयापचय वाढवणारी जीन्स सकाळच्या स्लॉटमध्ये जास्त असते. सकाळी लवकर रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने वजन कमी होते, यासह शरीरातील उर्जा देखील वाढते.