Join us   

तोंड सतत कोरडं पडतं, जीव पाणी पाणी होतो? तज्ज्ञ सांगतात कारणं आणि उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 4:39 PM

तोंड सारखं कोरडं पडण्याची कारणं काय असतात, त्यावरील उपाय कोणते, जाणून घ्या...

ठळक मुद्दे उन्हाळ्याशिवायही तोंड कोरडे पडत असेल तर तहान लागते असे म्हणून दुर्लक्ष करणे उपयोगी नाही...काय असतात तोंडाला कोरड पडण्याची कारणे, त्याची लक्षणे आणि उपाय...

उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तोंडाला कोरड पडते आणि आपल्याला तहान लागते. पाणी प्यायल्यावर आपल्या जरा जीवात जीव येतो. उन्हाळ्यात असे होणे ठिक आहे, पण एरवीही सतत असे होत असेल तर हे होण्यामागची कारणे शोधून काढणे आवश्यक असून त्याक़डे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. तहानेने तोंड कोरडं पडणं वेगळं पण नेहमीच तुमच्या तोंडाला कोरड पडत असेल तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायची गरज आहे हे लक्षात घ्यायला हवे. मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर किंवा इतर काही औषधांमुळे तोंडाला वारंवार कोरडेपणा येण्याची शक्यता असते. या औषधांमुळे आवश्यक तेवढी लाळ तयार होत नसल्याने तोंड कोरडे पडते. त्यामुळे कोरडे पदार्थ खाताना तोंडात वारंवार जखमा होतात. यामध्ये रुग्णांना गिळता न येणे, संसर्ग, दाताची कीड, जीभेवर चट्टा अशी लक्षणे दिसून येतात. हा गंभीर स्वरुपाचा आजार नसला तरीही रुग्णांना खाण्याची दैनंदिन क्रिया करणे अवघड जाते. याबाबत सांगत आहेत तोंडाचे विकारतज्ज्ञ डॉ. प्रियांका साखवळकर....

(Image : Google)

कारणे 

१. कॅन्सर उपचारानंतर याचा त्रास फारच जास्त असू शकतो. २. लाळग्रंथीचे विकार ३. मधुमेह, रक्तदाब व इतर काही आजार तसेच त्यांच्यासाठी दिलेल्या औषधांचा दुष्परीणाम ४. अतिमद्यपान ५. पाणी कमी पिणे

लक्षणे 

१. गिळताना त्रास होणे – विशेषतः कोरडे पदार्थ जसे की पापड, खाकरा, बिस्कीटे इ. २. कवळी व्यवस्थित न बसणे अथवा त्रास होणे. ३. बोलताना जीभ टाळूला चिकटून बोलताना त्रास होणे ४. वारंवार जखमा आणि संसर्ग होणे

अशाप्रकारची लक्षणे जाणवल्यास रुग्णांनी वेळ न दवडता वेळीच डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यायला हवा. 

उपाय 

१. वारंवार पाणी पिणे – अशा रुग्णांनी दर १ ते २ तासांनी निदान घोटभर तरी पाणी प्यावे. याने तोंड ओले ठेवण्यास मदत होते. बर्फ चघळल्यास त्याचाही फायदा होतो. २. कोरडे, कडक पदार्थ टाळावेत – पापड, खाकरा, कोरडा चिवडा असे पदार्थ टाळावेत. या पदार्थांनी जखम होऊ शकते.  ३. सूप, पातळ भाजी, मऊ पदार्थ यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा. ४. दिवसातून किमान २-३ वेळा ब्रश करुन तोंड जास्ती जास्त स्वच्छ ठेवावे. ५. मद्यपान, धुम्रपान टाळावे. ६. जास्त त्रास, वेदना, जखमा इ. असल्यास त्वरीत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कृत्रिम लाळ तयार करणारी किंवा इतर औषधे वापरुन रुग्णाचे जीवन सुसह्य करता येत ७. व्हिटॅमिन सी च्या गोळ्या घेण हा यामधील आणखी एक महत्त्वाचा उपाय असतो.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स