Join us   

उष्णतेमुळे सतत तोंड येतं? खाता येत नाही, तोंडात फोड डॉक्टरकडे जाण्यापूर्वी करा ६ घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 2:09 PM

आपल्याला नेहमीच तोंड येत असेल तर नियमितपणे आरोग्याची कोणती काळजी घ्यायची याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

ठळक मुद्दे नियमितपणे जेवणाच्या वेळा पाळायला हव्यात, यामुळे तोड येण्याची समस्या दूर होऊ शकतेजीवनसत्त्वांच्या अभावामुळे तोंड येत असल्याने नियमीत संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

तोंड येणे ही अगदी सामान्य गोष्ट वाटत असली तरी तोंड येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय समजून घेणे आवश्यक आहे. एकदा तोंड आले की काही खाता येत नाही की बोलता येत नाही. तोंडाची आग होणे, तोंडात फोड येणे, तोंडाचा आतला भाग लालसर होऊन जळल्यासारखे वाटणे अशा समस्या निर्माण होतात. अनेकदा गालाच्या आतल्या बाजूला, ओठांच्या आतल्या बाजुला आणि हिरड्यांच्या आजुबाजूला ही समस्या उद्भवते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर अनेकांना उष्णतेमुळे तोंड येण्याची समस्या उद्भवते. 

यावर वेळीच योग्य ते उपाय केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. मात्र अनेकांना ही समस्या वारंवार उद्भवते आणि त्याचा त्यांच्या दैनंदिन आरोग्यावर विपरित परिणाम होतो. आता तोंड येऊ नये म्हणून आणि आल्यावर काय करायचे हे समजून घेणे आवश्यक आहे. डॉक्टरकडे जाण्याआधी घरच्या घरी काही सोपे उपाय करुन पाहिल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. इतकेच नाही तर आपल्याला नेहमीच तोंड येत असेल तर नियमितपणे आरोग्याची कोणती काळजी घ्यायची याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. 

(Image : Google)

तोंड येण्याची कारणे 

१. सतत मसालेदार आणि तिखट पदार्थ खाणे २. धूम्रपान आणि अल्कोहोलचे व्यसन ३. दिर्घकाळ सुरु असलेले औषधोपचार ४. अति प्रमाणात चहा आणि कॉफीचे सेवन ५. पचनाच्या तक्रारी ६. दातांशी निगडित तक्रारी ७. जीवनसत्त्वांच्या अभावामुळे

उपाय 

१. पुरेशी झोप नसेल तरी तोंड येण्याची किंवा उष्णतेची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे अतिशय आवश्यक आहे. 

२. गार दूध, दही, ताक यांसारख्या पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. उन्हाळ्याच्या दिवसांत तर या गोष्टींचा अवश्य समावेश करायला हवा. 

३. सतत अतिमसालेदार, तिखट पदार्थ खाणे टाळावे. तसेच अतिगरम किंवा अति थंड पदार्थ खाणेही टाळावे. 

४. तुळशीची दोन ते तीन पाने चावून खावीत. तुळशीच्या रसाने तोंड येण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. 

(Image : Google)

५. जीरे चावून खाल्ल्याने त्याचाही चांगला उपयोग होतो. जिऱ्याच्या रसामुळे तोंड जाण्यास मदत होते. 

६. जेवणाच्या वेळा पाळणे ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट असून ज्यांना सतत तोंड येण्याचा त्रास होतो त्यांनी नियमितपणे जेवणाच्या वेळा पाळायला हव्यात.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससमर स्पेशल