Join us   

सकाळी झोपेतून उठल्यावर अंग ठणकतं, उठावसंच वाटत नाही, यामागे २ महत्त्वाची कारणं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2023 4:33 PM

Muscles or body stiffness 2 reasons behind body ache in the morning : आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी सांगतात...

सकाळी झोपेतून उठलं की आपल्याला झोप झाल्याने फ्रेश वाटायला हवं. पण अनेकांना झोपेतून उठल्यावर अंगदुखी, स्नायू ताणल्यासारखे दुखणे यांसारखे त्रास होतात. हा त्रास काहीवेळा अगदी कमी स्वरुपात असतो मात्र तो हळूहळू वाढत जातो. पण अनेकांचे हे दुखणे सहन न होण्याइतपतही असते. सुरुवातीला या दुखण्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण अंगदुखी जास्तच वाढली तर वेळीच यावर उपचार करावे लागतात. हे दुखणे आटोक्यात आले नाही तर मात्र यावर उपचार करण्याशिवाय पर्याय नसतो. सकाळी उठल्यावर खूप जास्त प्रमाणात जाणवणारे हे दुखणे आपण रोजची कामं करायला लागलो की गायब होते. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी हे दुखणे खूप वाढते. आता अशाप्रकारे अंगदुखी होण्यामागे नेमकी काय कारणं असतात आणि त्यावर कोणते उपाय करावेत याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी काही महत्त्वाची माहिती देतात ती समजून घेऊया (Muscles or body stiffness 2 reasons behind body ache in the morning)...

१. व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते महत्त्वाचे कारण 

शरीरात व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी, फोलेट यांसारख्या घटकांची कमतरता असेल तर अशाप्रकारे स्नायूदुखी किंवा अंगदुखीची समस्या उद्भवते. मात्र या कमतरता आहेत हे समजण्यासाठी तपासणी करणे आवश्यक असते. तपासण्या केल्यानंतर आवश्यकतेनुसार डॉक्टर आपल्याला सप्लिमेंटस देतात. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात योग्य ते बदल केल्यास या कमतरता भरुन निघण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हालाही अशाप्रकारची अंगदुखी उद्भवत असेल तर वेळच्या वेळी योग्य त्या तपासण्या करुन त्यावर उपचार करणे केव्हाही जास्त फायद्याचे ठरते.

२. कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधं..

शरीरात कोलेस्टेरॉल योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. नाहीतर हृदयाशी निगडीत समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जास्तीचे कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला डॉक्टर काही औषधे देतात. या औषधांमध्ये असणारे काही घटक स्नायूंना कमकुवत करण्याची शक्यता असते. स्टॅटीन हा यामध्ये असणारा महत्त्वाचा घटक शरीरात ऊर्जा तयार करण्यासाठी आवश्यक असणारे Q10 शरीरात शोषण्याची क्षमता कमी करते. त्यामुळे आपल्याला थकवा येतो किंवा अंगदुखी उद्भवते. त्यामुळे तुम्ही किंवा कुटुंबातील कोणीही व्यक्ती अशाप्रकारची औषधे घेत असाल तर त्याबाबत योग्य ती माहिती आणि काळजी घ्यायला हवी.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल