यशोदा वाकणकर
एपिलेप्सी, ज्याला फिट्स येणे, फेफरे, आकडी, मिरगी, अपस्मार ही सुद्धा नावं आहेत. ही एक मेंदूची व्याधी आहे, आणि उपचारांनी ही व्याधी व्यवस्थित आटोक्यात राहू शकते. खूप जास्त त्रास असणाऱ्या व्यक्तींची तर ब्रेन सर्जरी सुद्धा आता सहज उपलब्ध आहे. अशा तऱ्हेने औषधोपचारांनी किंवा सर्जरीने बऱ्या झालेल्या (नॅार्मल बुध्यांक असलेल्या) व्यक्ती अतिशय चांगलं जीवन जगू शकतात. १७ नोव्हेंबर हा राष्ट्रीय एपिलेप्सी दिवस मानला जातो. संवेदना फाऊंडेशन ही पुण्यातील संस्था गेली १९ वर्ष पूर्णपणे एपिसेप्सी ह्या विषयावरच काम करते. जनजागृतीची अजूनही समाजात नितांत गरज आहे. जर एखाद्या व्यक्तीला फीट आली तर काय करावे आणि काय करू नये ह्याची माहिती अजूनही सगळ्यांना असतेच असं नाही. आज मी ह्याच विषयावर लिहिणार आहे.
सर्वप्रथम मी फीट आली असता काय करू नये? १. हात पाय पकडून ठेऊ नयेत. त्याची जशी हलचाल आहे तशी होऊ द्यावी, फक्त त्यामुळे एपिलेप्सी असलेल्या व्यक्तीला किंवा इतरांना काही इजा होत नाही ना, याची काळजी घ्यावी. २. फिट आलेल्या व्यक्तीच्या नाकाला कांदा / चप्पल अजिबातच लाऊ नये. डोक्यावर झाडू मारू नये! ते अघोरी गैरसमज आहेत. फिट्सचा व झाडू /कांदा /चपलेचा सुतराम संबंध नाही. उलट त्याचा त्या व्यक्तीला फारच त्रास होतो. ३. फिट आलेली व्यक्ती पूर्णतः नेहमीसारखी सजग झाल्याशिवाय तिला पाणी पाजू नये. नाहीतर ते पाणी श्वासनलीकेत जाऊ शकते. ४. त्या व्यक्तींसमोर घरातल्यांनी रडायला लागू नये. इथे त्यांनी धीराने घेणं महत्त्वाचं असतं. आणि आपल्या घरचे आपल्या समोर रडत आहेत या ताणाने त्या व्यक्तीला हमखास दुसरी फीट येऊ शकते.
काय करावे? १. त्या व्यक्तीला मायेने धीर द्या. “मी आहे ना तुझ्याबरोबर, तू काही काळजी करू नकोस. सगळं छान होणार आहे.” शक्य असेल तर प्रेमाने जवळ घ्या व डोक्यावरून मायेने हात फिरवा. ह्यामुळे ती व्यक्ती पटकन निम्म्याहून अधीक बरी होईल. २. त्या व्यक्तीचे कपडे थोडे सैल करा. वारा घाला. डोक्यावर स्कार्फ गॅागल असेल तर काढा. टाय असेल तर सैल करा. ३. ती व्यक्ती आडवी असेल तर कुशीवर वळवा. उभी असेल तर खुर्चीत बसवा. ४. खूप माणसांनी गर्दी केली असेल तर त्यांना तिथून जाण्याची विनंती करा. एका व्यक्तीसाठी १-२ माणसं पुरतात. ५. सहसा ५-१० मिनिटात ती व्यक्ती नॅार्मलला येईल. पण तसं नाही झालं तर जवळच्या हॅास्पिटल मधे घेऊन जा. एपिलेप्सी असलेल्या व्यक्तीसाठी जोडिदाराची किंवा पालकांची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यामुळे त्या सर्वांना वरील मुद्दे नीटच माहित असणं फार महत्त्वाचं. त्या व्यक्तीला अती लाडावून नं ठेवणं, हट्टी नं बनू देणं ही काळजी घ्यावीच लागते. तुमच्या नॅार्मल मुलाला जसा धाक असतो, घरात शिस्त असते, तशीच या मुलांनाही असायलाच हवी. जेव्हा जेव्हा अडचणी येतात, ताण येतात, तेव्हा सायकॅालॅाजीस्टकडे जाणं, काऊन्सेलर कडे जाणं ह्यात कमीपणा मानू नये. तसेच एपिलेप्सी सपोर्ट ग्रूपचाही फारच उपयोग होतो. आपल्या माहितीतल्या कुणालाही एपिलेप्सी असेल तर ही माहिती त्यांच्या पर्यंत जरूर पोहोचवा. संवेदना फाऊंडेशन , एपिलेप्सी सपोर्ट ग्रूप, निवारा वृद्धाश्रम, नवी पेठ, पुणे ४११०३० दर बुधवारी दुपारी ४ ते ६. ९८२२००८०३५ / ९८५०८८७६४४
Yashoda.wakankar@gmail.com