Join us   

Navratri 2022 : ९ दिवसांचा उपवास आहे? आहारतज्ज्ञ सांगतात ४ गोष्टी, जपा नाहीतर....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2022 12:33 PM

Navratri 2022 Fasting Diet Tips : काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिले तर सणवार हा त्रागा न होता तो उत्सव होऊ शकतो.

ठळक मुद्दे उपवासाने शरीर थकलेले असेल तर आनंदासाठी दांडिया किंवा गरबा मध्ये सहभागी होणे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या कष्टाचे वाटू शकते.नऊ दिवसांत उपवास करणार असाल तर कोणते नियम पाळावेत याविषयी...

दिप्ती काबाडे 

आजपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. अनेक घरांमध्ये या नऊ दिवसांत स्त्रिया उपवास करतात. मात्र नव्या जगाशी सांगड घालताना परंपरा जपण्याचा प्रयत्न स्त्रियांकडून केला जातो. जर तुम्ही या नऊ दिवसांत उपवास करणार असाल तर कोणते नियम पाळावेत ज्याने तुमच्या तब्येतीला त्रास न होता सणाचा आनंद लुटणे तुम्हाला सोपे जाईल. काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिले तर सणवार हा त्रागा न होता तो उत्सव होऊ शकतो. पाहूयात यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे (Navratri 2022 Fasting Diet Tips).  

(Image : Google)

१. भरपूर पाणी प्या 

पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा नियम कोणत्याही परिस्थितीत पाळाच! शरीराचे डीहायड्रेशन होऊ नये म्हणून उपवासाच्या कालावधीत पुरेसे पाणी पिणे अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला पाण्यासोबत पोषण मिळू शकेल अशा शकतील त्या द्रव पदार्थांचा रोज आहारात समावेश ठेवा. ताज्या फळांचे रस, दूध, दही, ताक, शहाळ्याचे पाणी यांच्या योग्य प्रमाणात सेवनाने तुम्हाला शक्तीही मिळण्यास मदत होईल.

२. कडक उपवास टाळा 

मुख्य अन्नाची वेळ होईपर्यंत सतत काही न काही खात राहा. अनेक स्त्रिया या दिवसांमध्ये फक्त एकदा अन्न सेवन करतात. काही स्त्रिया दुपारचे जेवण व्यवस्थित घेतात तर काही रात्रीचे जेवण नीट करतात. असे करत असताना इतर वेळी दिवसभरात काही ना काही आरोग्यदायी पदार्थ, जे उपवासाला खाण्याची परवानगी आहे असे पदार्थ वरचेवर सेवन करत रहा. फळे, सुकामेवा, कंदमुळे उकडून खाणे, असे सोपे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.

३. जास्त दमणूक टाळा

ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही नोकरी करणारी स्त्री असाल तर या उपवासाच्या नऊ दिवसांत सुद्धा नोकरीवर जाणे तुम्हाला भाग आहे. परंपरा जपत असताना घरच्या इतर जबाबदाऱ्या, नोकरीवरच्या कामाचे प्रेशर आणि उपवास या सगळ्याची परिणती तुमचे आरोग्य बिघडण्यात होणार नाही याची काळजी घ्या. या नऊ दिवसांत अतिरिक्त तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी रोज हलका वॉक,. प्राणायाम यांचा आधार घ्या.

(Image : Google)

४. दांडिया, गरबामध्ये सहभागी होताना काळजी घ्या

उपवासाने शरीर थकलेले असेल तर आनंदासाठी दांडिया किंवा गरबा मध्ये सहभागी होणे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या कष्टाचे वाटू शकते. उपवासाचा शीण असेल, थकवा जाणवत असेल तर जास्त वेळ दांडिया किंवा गरबा खेळणे शक्यतो टाळा. खेळल्यानंतर उपवास रात्रीच्या आहाराने सोडा. रात्रीच्या आहारात कर्बोदके आणि प्रथिने जास्त प्रमाणात घ्या, ज्यामुळे दिवसभरात शरीराची झालेली झीज भरून निघेल आणि मनसोक्त दांडिया किंवा गरब्याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळेल. 

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत)

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स