नवरात्री म्हटलं की घटांची पूजा, देवीची पूजा आणि त्यासोबत व्रतवैकल्ये आणि उपवास ओघाने आलेच. नवरात्रीतील उपवास साधारणपणे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात करतो. एकीकडे घरातील धार्मिक गोष्टींची तयारी, घरातील नेहमीची कामे, ऑफीसचे काम, बदलते वातावरण आणि त्यात उपवास. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्याने कधी ऐन नवरात्रीत तर कधी नवरात्री नंतर महिलांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. दररोज आपण किमान ३ वेळा पोटभर खातो. पण एकाएकी ९ दिवसांचे उपवास म्हटल्यावर कधी थकवा येणे, उपवासाच्या पदार्थांमुळे अॅसिडीटी किंवा अपचन होणे, शरीराचे योग्य पोषण न झाल्याने ताकद कमी होणे अशाप्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र योग्य ती काळजी घेऊन उपवास केल्यास आपल्याला त्याचा त्रास तर होत नाहीच पण नवरात्रीच्या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करु शकतो. यासाठी प्रसिद्ध डायटीशियन शिखा अग्रवाल काही महत्त्वाच्या टिप्स देतात, त्याविषयी (Navratri Diet Fasting Tips for Good Health)...
१. बद्धकोष्ठता टाळायची तर...
या दिवसांत आहारात फायबर कमी प्रमाणात घेतले जाते, तसेच चहा-कॉफी घेण्याच्या प्रमाणातही वाढ होते. त्यामुळे बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते. अशावेळी राजगिरा पीठ, मखाणा हे पदार्थ आवर्जून खायला हवेत.
२. पाणी कमी पिणे धोक्याचे
अनेकदा आपण खाल्ले की पाणी पितो किंवा तिखट खाल्ले की थोडे पाणी जास्त प्यायले जाते. मात्र उपवासाचे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ल्याने किंवा ते फारसे तिखट नसल्याने पाणी पिण्याचे प्रमाण साहजिकच कमी होते. मात्र उपवास असतानाही पुरेसे पाणी प्यायला हवे.
३. भरपूर फळं खायला हवीत
उपवासादरम्यान केळी, सफरचंद, पपई, अंजीर, पेर, चिकू यांसारख्या फळांचा आहारात समावेश करावा. यामुळे आरोग्याला पोषण मिळण्यास मदत होते. फळांमध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. फळांमुळे शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहण्यास मदत होते.
४. आहारात दह्याचा समावेश करावा
उपवासामुळे अनेकदा बद्धकोष्ठतेसारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी दही खाल्ल्यास पचनाशी निगडीत समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि तब्येत चांगली राहावी यासाठी दह्याचा फायदा होतो.