डॉ. शिल्पा चिटणीस जोशी
१. मान काळी आहे म्हणून...
हे शरीरातील इन्शुलिन च्या वाढत्या प्रमाणाचं लक्षण आहे .ही मधुमेह दाराशी येऊन ठेपल्याची किंवा मधुमेह झाल्याचीच धोक्याची घंटा असू शकते .त्यासाठी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा. क्वचित ही समस्या लहान मुलांमध्येही दिसून येते .हे हॉर्मोन्स च्या असंतुलनाचे लक्षण असते आणि अशावेळी बालरोगतज्ज्ञ अथवा एन्डोक्रिनोलॉजिस्ट यांचा सल्ला लगेच घेणे उत्तम. बऱ्याच घरांमध्ये मान मळली आहे असे समजून ती जोरजोराने घासली जाते पण त्याचा काही उपयोग तर होत नाहीच ,उलट घासण्यामुळे काळेपणा वाढू शकतो (Navratri Special Health Misconceptions).
२. लठ्ठपणाबाबतचे गैरसमज वेळीच दूर करा
ही समस्या आपल्या समाजात भीतीदायक वेगाने वाढते आहे.काही घरांमध्ये सगळेच कुटुंबीय लठ्ठ असतात .आमच्या घरात लठ्ठपणाची अनुवंशिकताच आहे असा सोयीस्कर समज करून घेऊन लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केले जाते .खरी समस्या ही घरातली सतत आणि अतिखाण्याची संस्कृती ही असते .तसंच अजिबात व्यायाम न करणे ,त्यामुळे अंगात येणारा आळस ही लक्षणे घरात सगळ्यांमध्येच दिसून येतात. त्यामुळे ज्या घरांमध्ये सगळेच जास्त वजनाचे आहेत अशांनी स्वतःची जीवनशैली कठोरपणे तपासून त्यात बदल केल्यास संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
३. वजन वाढण्यास हेही महत्त्वाचे कारण
स्त्रियांची पाळी अनियमित असेल किंवा थायरॉईड ची समस्या असेल तर कितीही व्यायाम अथवा डाएट केले तरी वजन नियंत्रणात ठेवणे खूप कठीण जाते.तसेच अतिमानसिक ताण असेल तर शरीरात स्टिरॉइड हॉर्मोन्सचे प्रमाण वाढते ज्यामुळे वजन वाढू शकते. अनेकदा सगळं नीट असतानाही आपल्याला वजन का वाढतं असा प्रश्न पडतो. तेव्हा मनानेच काही निष्कर्ष लावून अति व्यायाम किंवा मनानेच डाएट न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते.
४. जेवणानंतर हे १ काम कराच
मधुमेही लोकांनी आणि मधुमेह होण्याचा धोका असलेल्यांनी प्रत्येक जेवणानंतर किमान पंधरा मिनिटे उभे राहावे, बसू नये. जेवण झाल्यानंतर आपली रक्तातील साखर एकदम वाढते आणि त्याप्रमाणात इन्सुलिन सुध्दा वाढते त्यामुळे शरीराला लगेच सुस्ती येते.आपण जेवणानंतर लगेच न बसता उभे राहिलो तर ही रक्तातील साखर एकदम वाढत नाही आणि सुस्ती पण कमी होते. या सवयीचा मधुमेही आणि मधुमेहाचा धोका असलेल्या व्यक्तींना दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. परिणामी Hba1C ची लेवल नियंत्रणात राहू शकते.
(लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)