Join us   

नवरात्र स्पेशल आरोग्य उपासना : नाजूक जागेचं इन्फेक्शन स्त्रिया अंगावर काढतात कारण हा ‘एक’ गैरसमज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2022 2:20 PM

Navratri 2022 Health Misconceptions of Women's : नवरात्र आणि आरोग्याची उपासना: स्त्रिया सर्वात जास्त आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. काही गैरसमज असल्याने स्वत:कडे दुर्लक्ष करतात. काय असतात ते समज-गैरसमज - भाग १

ठळक मुद्दे पावसाळ्यात किंवा एसी मध्ये काम करणाऱ्या महिलांना तहान जाणवत नाही आणि त्यामुळे कमी पाणी प्याले जाते.नाजूक दुखण्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे, नाहीतर आरोग्याची हेळसांड होते

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

बाहेरचे स्वच्छतागृह वापरल्यामुळे जंतुसंसर्ग होतो हा सर्वात मोठा आणि सर्वांच्या मनात असलेला गैरसमज आहे. या चुकीच्या समजुतीपायी खूप स्त्रिया स्वतःचे नुकसान करून घेतात. स्वच्छतागृह कितीही घाण असले तरीही स्त्रियांना त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकत नाही कारण हे संसर्ग हवेतून पसरत नाहीत. पण तरीही प्रवासात किंवा बाहेर असताना अनेकजणी केवळ टॉयलेट स्वच्छ नाहीत किंवा टॉयलेटला जायची सोयच नाही म्हणून लघवीला जाणे टाळतात (Navratri 2022 Health Misconceptions of Women's). 

(Image : Google)

बहुतेक स्त्रिया स्वच्छतागृहात कुठेही स्पर्श न होऊ देता मूत्रविसर्जन करू शकतात. मात्र टॉयलेट मध्ये जायला लागू नये म्हणून पाणीच कमी पिणे आणि लघवी आली असताना ती दाबून ठेवणे ही लघवीच्या जंतुसंसर्गाची मुख्य कारणे आहेत. दाबून ठेवलेल्या लघवीमध्ये खूप पटकन जंतुसंसर्ग होतो हे वैद्यकीय सत्य आहे. याबद्दल खूप जास्त जनजागृती होण्याची गरज आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह खरं तर भारतीय पद्धतीची असणे स्त्रियांच्या आरोग्यासाठी जास्त हितकारक आहे. ती स्वच्छ ठेवणे ही सोपे जाते. मात्र त्यासाेबतच रोजच्या काही सवयी इन्फेक्शनला कारणीभूत ठरतात.

१. पाणी कमी पिण्याची सवय असेल तर मूत्रमार्ग कोरडा पडण्याची शक्यता असते. कोरडा पडलेल्या मूत्रमार्गाची प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. रोज ८ ते १० ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. 

२. पावसाळ्यात किंवा एसी मध्ये काम करणाऱ्या महिलांना तहान जाणवत नाही आणि त्यामुळे कमी पाणी प्याले जाते.

(Image : Google)

३. मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग म्हणजे युरीन इन्फेक्शन आणि योनीमार्गात होणारा जंतुसंसर्ग याची लक्षणे बऱ्याच वेळा सारखी असतात. स्त्रिया अशावेळी तपासून न घेता फॅमिली डॉक्टर कडून, ओळखीच्या डॉक्टरकडून ,कधी कधी तर केमिस्ट कडून तात्पुरती औषधे आणि क्रीम्स घेतात. हे हानिकारक ठरू शकते.

४. विनाकारण अँटिबायोटिक्स अथवा स्टिरॉइड्स असलेली क्रीम्स दिली जाण्याचा धोका यामुळे वाढतो आणि परिणामी पेशंटला जास्तच त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे वेळेत स्त्रीरोगतज्ञांना दाखवणे उत्तम.

५. सगळ्यात महत्त्वाचे दुखणे अंगावर काढू नका.

(उद्या बोलू दुसऱ्या एका गैरसमजाविषयी)

(लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल