Join us   

नवरात्र स्पेशल आरोग्य उपासना : आपल्याला थायरॉईड झालाच तर? तज्ज्ञ सांगतात, थायरॉईडची लक्षणे ओळखून नेमकी कशी बदलायची जीवनशैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 11:34 AM

Navratri Special Health Misconceptions Thyroid Problem : दुर्दैवाने आपल्या समाजात स्त्रिया व मुली यांना कोणताही आजार वर्षानुवर्षे अंगावर काढण्याचं जणू बाळकडूच मिळालेले आहे, त्यामुळे समस्या वाढत जातात.

ठळक मुद्दे व्यायाम जरूर करा पण वेडेवाकडे मानेचे व्यायाम केल्याने थायरॉईडची समस्या दूर होणार तर नाहीच पण मानेचे दुखणे सुरू होऊ शकेल.थायरॉईड नियंत्रणात नसेल तर कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढू शकते.

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

स्त्रियांमध्ये साधारणपणे चाळिशीनंतर साधारणपणे थायरॉईडच्या समस्येचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. मात्र काही वेळा कमी वयातही ही समस्या उद्भवत असल्याचे आपण आजुबाजूला पाहतो. यामध्ये आनुवंशिकता हा महत्वाचा घटक आहे. आई, मुलगी, मावशी, मावसबहीणी यांमध्ये थायरॉईडची समस्या असू शकते. त्यामुळे आईला ही समस्या असेल तर वेळीच मुलीची तपासणी करून घेणे योग्य आहे.चाळिशीनंतर प्रत्येक स्त्रीने दरवर्षी एकदा ही तपासणी करून घ्यायला हरकत नाही. फक्त TSH ची तपासणी केली तरी पुरते आणि ही अजिबात महागाची टेस्ट नाही. शिवाय जन्मतः प्रत्येक बाळाची थायरॉईड ची टेस्ट केली जाते, ती अत्यंत महत्त्वाची असते. जन्मतः थायरॉईडची समस्या असल्याचे निदान वेळेवर झाले नाही तर बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीवर अतिशय गंभीर परिणाम दिसून येतात (Navratri Special Health Misconceptions Thyroid Problem).

(Image : Google)

अनियमित पाळी, अतिरक्तस्त्राव, वाढलेले वजन, अंगावर सूज, कायम थकल्यासारखे वाटणे, नैराश्य, बद्धकोष्ट ही थायरॉईडची समस्या असल्याची प्राथमिक लक्षणे असू शकतात. दुर्दैवाने आपल्या समाजात स्त्रिया व मुली यांना कोणताही आजार वर्षानुवर्षे अंगावर काढण्याचं जणू बाळकडूच मिळालेले आहे. त्यामुळे बऱ्याच जणी आमच्याकडे खूप उशिरा येतात. तोपर्यंत वाढून बसलेल्या वजनाचा राक्षस कसा आवरायचा हा प्रश्न आम्हाला कायम भेडसावतो. तसेच कोणतेही वेगवेगळे उपचार घेताना थायरॉईड ची गोळी बंद करणे धोकादायक ठरू शकते. तसेच आजच्या घडीला थायरॉईड,मधुमेह,ब्लड प्रेशर,पॅरालिसीस,कॅन्सर्स असे अनेक आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू वैदू लोकांचे पेवच फुटले आहे. भोळ्याभाबड्या जनतेला फसवणे त्यामानाने फारच सोपे आहे. खरंतर सरकारने अशा लोकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

थायरॉईडबाब महत्त्वाच्या गोष्टी

१. थायरॉईडमुळे केस खूप प्रमाणात गळू शकतात. त्यामुळे केसगळतीमुळे तुम्ही हैराण असाल तर ही एक महत्त्वाची समस्या आहे हे लक्षात घ्या.

२. वजन वाढणे,त्वचा कोरडी होणे हे परिणाम ही दिसतात.बऱ्याच वेळा वजन वाढलेल्या पेशंट मला थायरॉईड आहे म्हणून वजन जास्त आहे अशी स्वतःची आणि इतरांची समजूत करून घेतात. 

३. वेळेवर व्यवस्थित गोळ्या घेतल्या आणि आहार आणि व्यायाम चालू ठेवला तर वजन आटोक्यात रहायला काहीच हरकत नसते. तसंच वेळेत थायरॉईडचे निदान झाले तर केसांची आणि इतर समस्या गंभीर रूप धारण करण्याआधीच उपचार सुरू करता येतात. त्यामुळे थायरॉईडची टेस्ट करण्याबद्दल डॉक्टरांनी सुचवले तर ती लगेच करून घेतलेली उत्तम.

(Image : Google)

४. थायरॉईडची समस्या असलेल्या रुग्णांमध्ये कॅल्शियमची कमतरता जास्त प्रमाणात आढळते. 

५. थायरॉईड नियंत्रणात नसेल तर कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढू शकते.

६. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही थायरॉईडची समस्या उद्भवू शकते पण आपल्याकडे मिठामध्ये आयोडीन असणे बंधनकारक आहे त्यामुळे हा धोका कमी होतो.काही जण आयोडीनयुक्त मीठ न खाता वेगळे मीठ खातात,त्यांनी हा धोका लक्षात घ्यायला हरकत नाही.

७. थायरॉईडची समस्या कोणत्याही प्रकारच्या व्यायामाने कमी होत नाही हे वैद्यकीय सत्य आहे. व्यायाम जरूर करा पण वेडेवाकडे मानेचे व्यायाम केल्याने थायरॉईडची समस्या दूर होणार तर नाहीच पण मानेचे दुखणे सुरू होऊ शकेल.

(उद्या बोलू दुसऱ्या एका गैरसमजाविषयी)

(लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल